Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» LBT Issue At Jalgaon

जळगावात दुप्पट एलबीटीला उद्योजकांचा विरोध

प्रतिनिधी | Dec 17, 2013, 10:40 AM IST

  • जळगावात दुप्पट एलबीटीला उद्योजकांचा विरोध
जळगाव- पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडून मंजूर करवून घेतलेल्या सुधारित करसूचीत सोने-चांदीसह काही वस्तूंवरील एलबीटी कमी केली असली तरी उद्योगांना लागणार्‍या कच्च्या मालावरील कर दुप्पट करण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत पूर्ववत एक टक्का एलबीटी होत नाही तोपर्यंत करभरणा न करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे.
जळगाव पालिका हद्दीत 1 एप्रिल 2010 पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत उद्योजकांना लागणार्‍या सर्व कच्च्या मालाच्या किंमतीवर 1 टक्का एलबीटी वसूल करण्यात येत होता. सुधारित दर सूचीनुसार सर्व कच्च्या मालावर 1 डिसेंबरपासून 2 टक्के एलबीटी भरावा लागणार आहे. जळगाव पालिका हद्दीतील प्लास्टिकसह इतर उद्योजकांना याचा फटका बसणार आहे. एमआयडीसीमधील 1 हजार 300 पेक्षा अधिक उद्योजकांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. यात 120 कंपन्या चटई निर्मितीशी संबंधित आहेत. 100 कंपन्या पाइप व संबंधित निर्मितीत आहेत. उद्योजकांकडून 1 टक्के प्रमाणे दरमहा पालिकेला 1 कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. दुपटीने एलबीटी भरण्यास उद्योजकांचा विरोध आहे. या प्रकरणी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने 9 डिसेंबरला आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीत कोणताही निर्णय झालेला नाही. जो पर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत डिसेंबरचा करभरणा करायचा नाही, असा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका पालिकेच्या तिजोरीवर बसणार आहे.
पुन्हा याच मुद्यावर बैठक
वाढीव एलबीटीच्या मुद्यावर गेल्या सोमवारी 9 डिसेंबरला आयुक्तांसोबत उद्योजक शिष्टमंडळाची प्राथमिक बैठक झाली होती. या बैठकीत र्मयादित उद्योजक उपस्थित होते. प्रशासनाने ठोस उत्तर दिले नव्हते, पुन्हा याच मुद्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोठय़ा संख्येने उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
एक पैसाही देणार नाही
उद्योजकांकडून पालिकेला दरवर्षी मालमत्ता करातून 4 कोटी तर एलबीटीतून सुमारे 36 कोटी रुपये दिले जातात. त्या बदल्यात पालिकेकडून उद्योजकांना अपेक्षित प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाही. आता यांना एलबीटीतून 72 कोटींची अपेक्षा आहे. जोपर्यंत एलबीटी 1 टक्का होत नाही तोपर्यंत उद्योजक पालिकेला एक पैसाही देणार नाही.
-भुवनेश्वर सिंग, अध्यक्ष, जिंदा

Next Article

Recommended