आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात एलबीटीच्या सुधारित दराने उद्योजक, गृहिणींना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका हद्दीतील उद्योगांना लागणार्‍या कच्च्या मालावर तसेच नवीन मशिनरीवर 2 ऐवजी केवळ 1 टक्के एलबीटी आकारणीचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. यासह घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर लावलेला 3 टक्के एलबीटी पूर्णपणे रद्द करण्यासही मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भातील अधिसूचना जाहीर होणार आहे.

राज्य शासनाने उद्योगांना लागणारा कच्चा माल व इतर बाबींसाठी 2 ते 4 टक्के एलबीटी आकारणीचा स्लॅब तयार करून दिला होता. जळगाव महापालिका हद्दीतील उद्योगांसाठी लागणार्‍या कच्च्या मालावर 1 डिसेंबरपासून 1 ऐवजी 2 टक्के एलबीटी आकारणी करण्याचा बदल यात करण्यात आला होता. आधिच अडचणीत असलेल्या उद्योजकांकडून या गोष्टीला विरोध झाल्याने पालिकेतर्फे उद्योजकांच्या मागणीचा विचार करून सुधारित दुरुस्तीपत्रक तयार करून ते पालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी 16 जानेवारी रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव र्शीकांत सिंग यांच्याकडे सादर केले होते. या सुधारित दरसूचीला शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, यासाठी राज्य व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता.

अखेर शनिवारी मुख्यमंत्र्यांकडून जळगाव पालिका आयुक्तांनी पाठविलेल्या सुधारित दरसूचीला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भातील अधिसूचना शासनाकडून पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय जळगावातील उद्योजक तसेच गृहिणींना दिलासा देणारा आहे.