आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Tax Canceled Issue At Jalgaon , Divya Marathi

एलबीटी रद्दच्या हालचालींमुळे अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य शासनातर्फे एलबीटी रद्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. जळगावचे वार्षिक 65 ते 70 कोटीचे उत्पन्न अचानक बंद झाल्यास महापालिकेचा गाडा हाकायचा कसा? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. शासनातर्फे व्हॅटवर सरचार्ज लावला तरी याची अंमलबजावणी आणि निधी हातात कधी पडेल, याबाबत साशंकता आहे.
जळगाव पालिका हद्दीत जकात बंद झाल्यावर 1 एप्रिल 2010पासून एलबीटी लागू झाली आहे. चार वर्षांतील एलबीटीचे उत्पन्न पाहता 45 कोटीवरून 65 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातून दरमहा मिळणार्‍या 5 ते 6 कोटी उत्पन्नातून पालिकेची बरीच कामे मार्गी लागत होती. शासनातर्फे एलबीटी बंद करून व्हॅटवर सरचार्ज लावला जाऊ शकतो.
जळगाव जिल्ह्यातून व्हॅटच्या माध्यमातून शासनाला गेल्यावर्षी 502 कोटी मिळाले होते. जिल्ह्यातून येणार्‍या व्हॅटवरील सरचार्जची रक्कम संबंधित पालिकांना देण्याचे धोरण ठरल्यास जळगाव मनपाला सध्या मिळणार्‍या उत्पन्नातही घट येऊ शकते. शासनाने एलबीटी रद्द करताना पालिका प्रशासनाचे मत विचारात घेतलेले नाही.

मुद्रांक शुल्कही दुपटीची शक्यता
राज्यभरातील 25 मनपामध्ये एलबीटीच्या माध्यमातून 17 हजार कोटी उत्पन्न येते. त्या तुलनेत राज्यातील व्हॅटचे उत्पन्न 65 हजार कोटी आहे. व्हॅटवर सरासरी 4 ते 5 टक्के अधिभार लावला तरी 17 हजार कोटी उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्क आकारणी दुप्पट करण्यावर शासन विचार करत आहे. शिवाय परागमन शुल्क वसुली जैसे थे राहण्याची शक्यता आहे. एलबीटी रद्दची घोषणा या आठवड्यात तर व्हॅटवर अधिभार लावण्याची घोषणा अधिवेशनात होऊ शकते.

राज्य शासनाने मागवली माहिती
नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी यांनी 22 मे 2014 रोजी पालिकेला पत्र पाठवले आहे. या पत्रात जळगाव मनपाला पेट्रोल-डिझेल, वाहन आणि मद्य यापासून मिळणार्‍या एलबीटीच्या रकमेची दोन वर्षांची माहिती मागवण्यात आली होती. प्रशासनाने ही माहिती शासनाला कळवली आहे.

वार्षिक 8.76 कोटींचे उत्पन्न
शहरात विकल्या जाणार्‍या पेट्रोल-डिझेलवर 2 टक्के, वाहनांवर 4 टक्के, मद्यावर 7 टक्के एलबीटी आकारली जाते. 2012-13मध्ये पेट्रोल डिझेलपासून 2 कोटी 63 लाख, वाहन 1 कोटी 58 लाख, मद्य 3 कोटी 26 लाख असे 7 कोटी 47 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. 2013-14मध्ये पेट्रोल-डिझेलपासून 3 कोटी 42 लाख, वाहन 1 कोटी 84 लाख, मद्य 3 कोटी 50 लाख असे 8 कोटी 76 लाख उत्पन्न मिळाले होते.
चैनीच्या विविध वस्तूंवर व्हॅट सरचार्जची शक्यता
व्हॅटमध्ये काही टक्के सरचार्ज लावायचा झाल्यास सरसकट सर्वच वस्तूंवर लावता येणे शक्य नाही. काही वस्तूंवर 1 ते 4 टक्क्यांपर्यंत व्हॅट आहे. यात पुन्हा 4 टक्के वाढ केल्यास कर दुप्पट केल्यासारखा होणार आहे. त्यामुळे चैनीच्या वस्तूंवर सरचार्ज आकारला जाण्याची शक्यता आहे. मद्यावर 25 टक्के व्हॅट आहे, वाहनांवर 12.5 टक्के तर पेट्रोल आणि डिझेलवर 25 टक्के व्हॅट आकारणी केली जाते. या चैनीच्या वस्तूंवर अजून 3 ते 4 टक्के अधिभार लावला तरी त्याचा एकदम फरक जाणवणार नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून महापालिकांना या वस्तूंपासून मिळणार्‍या उत्पन्नांची माहिती मागवली आहे.

जळगाव, सोलापूरलाही फटका
एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने व्यापार्‍यांकडून कर भरण्याचा प्रतिसाद मंदावला आहे. दरमहा सुमारे 6 कोटीपर्यंतचा भरणा होणार्‍या जळगाव मनपात एप्रिलचा भरणा 4 कोटी 72 लाखांपर्यंत गेला आहे. सोलापूर पालिकेला एलबीटीतून दरमहा साडेपाच कोटीचे उत्पन्न मिळत होते, गेल्या महिन्यात केवळ 3 कोटी 20 लाख रुपये उत्पन्न आले आहे.

महापालिकेला विविध करांमधून मिळणारे उत्पन्न
आर्थिक वर्ष एलबीटी मुद्रांक शुल्क परागमन शुल्क एकूण
2010-11 45.26 4.24 0.91 58.60
2011-12 58.11 4.29 9.68 72.09
2012-13 55.17 4.47 14.38 74.02
2013-14 64.18 3.64 14.95 82.77