जळगाव - जिल्हापरिषद प्रशासनाने ऑनलाइन हजेरी प्रणाली, इझी स्ट्रॉमसह फाइल ट्रॅकिंग सिस्टिम आदी अद्ययावत सुविधा सुरू केल्या आहेत. विविध अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, दोन्ही इमारतीतील कार्यालयात संपर्क साधण्यासाठी असलेले ईपीबीएक्स मशीन वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याने अंतर्गत संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. परिणामी प्रत्येक विभागातून हजारो रुपयांचा दूरध्वनी बिलाचा भुर्दंड जि.प. प्रशासनास बसत असल्याची स्थिती आहे. तसेच नागरिकांना संवाद साधणे कठीण झाले अाहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर ईपीबीएक्स मशीनवर दोन स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले होते. या मशीनद्वारे जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमध्ये बाहेरून आलेले दूरध्वनी संबंधित कार्यालयात जोडून दिले जात होते. त्यामुळे संवाद सहज शक्य होता. वर्षभरात या मशीन देखभाल-दुरुस्तीचाच तेवढा खर्च होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे मशीन बंद पडल्याने संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. प्रत्येक विभागात स्वतंत्र दूरध्वनी नंबर आहेत. विविध शासकीय कामानिमित्त जुन्या इमारतीतून नवीन इमारतींशी संपर्क साधण्यासाठी कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या दूरध्वनीवर संपर्क साधावा लागतो. ईपीबीएक्स मशीनमुळे मोफत संवाद होत होता. आता मात्र प्रत्येक विभागाच्या दूरध्वनी बिलात वाढ होत असल्याने सुमारे लाखापेक्षा अधिक रुपयांचा दूरध्वनीचा भुर्दंड जिल्हा परिषदेस सहन करावा लागत आहे. ईपीबीएक्स मशीन स्वागत कक्षात पडून आहे. दुरुस्ती केल्यास ते पूर्ववत सुरू होणे शक्य आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही यंत्रणा अद्ययावत करावी, अशी मागणीही कर्मचारी, नागरिकांमधून केली जात आहे.