आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने घेतला 37 बक-यांच्या नरडीचा घोट, शेतक-यावर कोसळले आभाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- सोनाळा येथील गोटफार्मवर हल्ला करून बिबट्याने 37 बक-यांच्या गळ्यावर घोट घेतला. यात 41 पैकी 20 बक-या ठार झाल्या असून 17 बक-या गंभीर जखमी झाल्या. चार बक-या बिबट्याने उचलून नेल्या. या घटनेची वेळेवर माहिती देऊनही चार तासांनी पोहोचलेले अधिकारी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला.
केवळ शेतीवर विसंबून न राहता सोनाळा येथील श्रीराम नारायण पाटील यांनी अडीच महिन्यांपूर्वी आपल्या शेतात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गोटफार्म सुरू केला. ४१ बक-या बोकड असलेल्या या गोटफार्मवर पाटील यांनी साडेतीन लाख रुपये खर्च केले. वाढत्या बक-यांबरोबरच पाटील यांच्या व्यवसायाच्या आशाही पल्लवीत होत होत्या. पण रविवारी पहाटे तीन वाजेनंतर बिबट्याने हल्ला केल्याने पाटील यांच्या आशेवर पाणी फिरले.
पाच वाजेदरम्यान जाग आल्याने गोटफार्मवर झोपलेले पाटील हे घरी आले. अंघोळ आटोपून साडेसात वाजेदरम्यान पुन्हा शेतात गेले. तेव्हा त्यांना गोटफार्ममध्ये जखमी मृतावस्थेत बक-या ठिकठिकाणी पडलेल्या दिसल्या. हे पाहून पाटील यांच्यावर आभाळच कोसळले. पाटील यांनी तत्काळ वनविभाग पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
वनविभागाचे दुर्लक्ष
सोनाळाशिवारात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. याबाबत वनविभाग अधिका-यांना माहिती देऊनही वनविभागाने दुर्लक्ष केले, असे आरोप गोटफार्मवरील घटनेनंतर शेतकऱ्यांनी केले. वनपाल केशव कानडे यांनी पंचनामा केला.
...तर वाचल्या असत्या बक-या
गोटफार्मवर बिबट्याने हल्ला केला. सहा फुटी तारांच्या जाळीने बंदिस्त असलेल्या गोटफार्मच्या आतून हल्ला झाल्यानंतरही बक-यांना पळ काढता आला नाही. बिबट्याने बकरी मारून न खाता प्रत्येक बकरीच्या गळ्याचा घोट घेऊन केवळ रक्त प्यायल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून स्पष्ट झाले. या हल्ल्यात 20 बक-या ठार झाल्या असल्या तरी 17 बक-या जखमी पण जिवंतावस्थेत आहेत. घटना उघडकीस येताच तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कळवण्यात आले. मात्र, त्यानंतर चार तासांनी डॉ. एस. एच. व्यवहारे डॉ. राहुल ठाकूर हे दोन्ही पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकारी लवकर आले असते तर अनेक बक-यांना जीवदान मिळाले असते, पण अधिकारी उशिरा आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
अन् सुन्न झालो
केवळ शेतीच्या उत्पन्नावर विसंबून राहता जोडधंदा म्हणून गोटफार्म सुरू केला. ३९ बक-या दोन बोकड घेतले. दररोज शेतातच गोटफार्मवर झोपायचो. नेहमीप्रमाणे आजही पहाटे तीन वाजेनंतर घरी गेलो. सकाळी साडेसात वाजता परत शेतात आलो असता, तेव्हा मृतावस्थेतील बक-या पाहून सुन्न झालो. श्रीरामनारायण पाटील, गोटफार्मचेसंचालक, सोनाळा