आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याला पकडण्यासाठी सात सात पिंजऱ्यांचा सापळा, सातव्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- चाळीसगाव तालुक्यात दाेन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली. त्याच्या हल्ल्यात अाठवर्षीय बालक महिलेचा बळी गेला. पाच जण जखमी झाले तर १० गुरांचा त्याने फडशा पाडला. वनविभागाने त्याला पकडण्यासाठी सात पिंजरे लावले. त्यातील पाटणादेवी अभयारण्य शेजारील पिंपरखेड शिवारात सातव्या पिंजऱ्यात बांधलेल्या शेळीची शिकार करताना साेमवारी पहाटे वाजता ताे जेरबंद झाला. 

उंबरखेड, पिंपळगाव-म्हाळसा येथून पाटणादेवी डाेंगराखालील पिंपरखेड शिवार ते काेदगावपर्यंत या बिबट्याने दाेन महिन्यांपासून धुमाकूळ घातला. गेल्या महिन्यात उंबरखेड येथून तीन किलाेमीटर अंतरावर तिरपाेळे शिवारात ऊसाच्या शेतात गवत काढणीचे काम करणाऱ्या अाईसाेबतच्या अाठवर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला चढवला हाेता. त्यात त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना उंबरखेडे येथून सहा किलाेमीटर अंतरावर तामसवाडी शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला केल्याने तिचाही मृत्यू झाला हाेता. शेळ्या, वासरू, गायीसह १० पशूंचा या बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकरी भयभीत हाेते. शेतात जाणेही ते टाळायचे. 

शेती कामांना लागला हाेता ब्रेक 
बिबट्याच्या दहशतीने बहाळ, मेहुणबारे, उंबरखेड, सायगाव, पिलखाेड, मांदुर्णे, पिंपळवाड, म्हाळसा, तामसवाडी, पिंपरखेड, चितेगाव या भागात दाेन महिन्यांपासून शेतीची कामे खाेळंबली. गटागटाने शेतकरी शेतांमध्ये जात असले तरी फटाके, शिट्यांच्या अावाजात कामे करावी लागत हाेती. खबरदारीच्या उपाययाेजना करूनही बिबट्याने दाेघांचा बळी घेऊन पाच जणांना जखमी केले हाेते. लाेकभावना तीव्र झाल्याने वनविभागाने गेल्या अाठवडाभरापासून बिबट्याची शाेध माेहीम अधिक तीव्र केली हाेती. 

शेती शिवारात लावले पिंजरे 
गिरणा परिसरातील पाच ते सहा शेतीशिवारात बिबट्याचे हल्ले सुरू हाेते. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंपळवाड-म्हाळसा पिंपरखेड शिवारात ठिकाणी पिंजरे लावले. त्यांच्यावर सेन्सर कॅमेऱ्यांची नजर ठेवली. दिवसा रात्री गनमॅनची गस्त निरंतर सुरू ठेवली. बिबट्याच्या पायांचे ठसे पाहून पिंपरखेड शिवारात सातव्या क्रमांकाच्या पिंजऱ्यात एक शेळी बांधली. तिची शिकार करण्यासाठी साेमवारी पहाटे वाजता बिबट्या येताच त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. गेल्या अाठवड्यात सायगाव-पिलखाेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी केली हाेती. त्याची दखल घेऊन वनमंत्र्यांनी विशेष माेहीम राबवण्याचे अादेश वनविभागाला दिले. त्यानंतर येथील अधिकारी कामाला लागले हाेते. 

वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न 
महिनाभरात बिबट्याने लहान मुलासह एका महिलेस ठार केले. तसेच शेळ्या, गाय, वासरूसह १० पशुंची हत्या केली. अखेर नरभक्ष्यक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

दमछाक थांबली 
बिबट्या गेल्या दाेन महिन्यांपासून पिंजऱ्यात अडकत नव्हता. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक सुरू हाेती. साेमवारी ताे जेरबंद झाल्याने दमछाक थांबली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाच्या सुरक्षारक्षकाने देताच अामदार उन्मेष पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय माेरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठाेंबरे वनकर्मचाऱ्यांनी पिंपरखेड शिवार गाठले. पाेलिस वनरक्षकांच्या बंदाेबस्तात पिंजऱ्यासह बिबट्याला ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत ठेऊन वनविभागाच्या कार्यालयात अाणण्यात अाले. 

सातपुडा, मेळघाटात साेडणार 
जेरबंद झालेल्या बिबट्याचे वय तीन वर्षे अाहे. वनविभागाने त्याच्या गळ्यात एक चीप लावलेली अाहे. तिचे स्कॅनिंग करून ताे कुठल्या क्षेत्रातून अाला हे स्पष्ट हाेईल. पिंपळवाड-म्हाळसा पिंपरखेड शिवारात केलेल्या शिकारी मनुष्यांवरील हल्ल्यांच्या घटनांच्या साधर्म्यावरून ताे हाच बिबट्या असावा. वैद्यकीय तपासणीनंतर वरिष्ठांशी चर्चा करून त्याला सातपुडा अथवा मेळघाट जंगलात साेडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय माेरे म्हणाले. शेतकऱ्यांना शेतात शिट्या, फटाक्यांच्या अावाजात काम करावे लागत हाेते. निंदणी रखडल्याने पिकांचे नुकसान झाले. 

हल्ल्यांचे सत्र थांबल्याने दिलासा 
वन विभागाने बिबट्याला पकडल्याने अाता हल्ल्यांचे सत्र थांबेल म्हणून शेतमजुरांना दिलासा मिळाला. पिंपळवाड शिवारात २६ सप्टेंबर राेजी दुपारी २.३० वाजता निंदणी करण्याचे काम सुरू हाेते. याच वेळी शेतमजुर महिला भारती देवकर यांच्यावर बिबट्याने समाेरून जाेरदार हल्ला केला हाेता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या हाेत्या. मात्र, त्यांच्या साेबतच्या तीन महिलांनी काठी दगडांचा जाेरदार वर्षाव करून त्याला पिटाळून लावले हाेते. त्यानंतर चार दिवसांनी हा बिबट्या जेरबंद झाला, हे विशेष. त्यानंतर चाळीसगाव येथून त्याला जळगावात उप वनसंरक्षक अादर्श रेड्डी (प्रादेशिक वनविभाग, जळगाव) यांच्या कार्यालयात अाण्यात अाले. त्यांनी त्याची पाहणी करून सूचना दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...