आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात दडून बसलेल्या बिबट्याला ठेचून मारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या बिबट्याला जमावाने ठार केल्याची घटना बेलखेडा (ता. भुसावळ) येथे मंगळवारी घडली. घटनास्थळी आलेले वनकर्मचारी व पोलिसांसोबतही ग्रामस्थांनी हुज्जत घालत शेतातच मृत बिबट्याला जाळण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यानंतर वन कर्मचार्‍यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास संगीता मंगलसिंग पाटील शेतातून घराकडे परतत होत्या. रस्त्यात एका शेतात लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घाबरलेल्या संगीता यांनी मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा शेजारील शेतातील दोघे मदतीसाठी धावून आले. बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. हे तिघेही जिवाच्या आकांताने ओरडू लागले, त्यामुळे इतर शेतकरी, ग्रामस्थ धावून आले. जमाव पाहताच बिबट्याने पिकामध्ये धूम ठोकली. मात्र जमावाने खडा पहारा ठेवला.

काही वेळातच बिबट्याने पुन्हा हल्ला चढवून सात-आठ जणांना जखमी केले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने भाले, कुर्‍हाडी, लाठय़ा-काठय़ा आणि हातात दगड घेऊन त्याला चारही बाजूने घेरले. काही वेळातच पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी बिबट्याला जंगलात पळवण्यासाठी चार वेळा हवेत फायरिंग केले. तरीही उपयोग झाला नाही. अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जमावाने बिबट्याला घेरून त्याची हत्या केली.

( फोटो : जळगाव जिल्ह्यातील बेलखेडा येथील शेतात दडून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.)