आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard On Environment Friends Wedding Card At Jalgaon News In Marathi

अनोखी लग्नपत्रिका; पर्यावरणप्रेमीच्या लग्नपत्रिकेवर बिबट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- "पर्यावरण बचाव'चा संदेश देण्याचे काम अनेक जण करतात. मात्र, आपल्या कृतीतून पावलोपावली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विरळच. जळगावातील विवेक देसाई यांनी मात्र लग्नपत्रिकेपासूनची सुरुवात पर्यावरण जागृतीने केली आहे. बिबट्याचे कव्हर आणि पर्यावरणाचा संदेश देणारे वाक्य प्रत्येक पानावर घेतले आहे.

पत्रिकेत अनेक पारंपरिक गोष्टींना फाटा दिला आहे. विशेष म्हणजे वन विभागातच कार्यरत असलेल्या त्यांच्या वाग्दत्तवधूनेही यासाठी संमती दिली. विवेक विजय देसाई हे बायोलॉजिस्ट आयडियल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण वाचवण्याच्या उद्देशाने ते काम करीत आहेत. ४ डिसेंबर रोजी त्यांच्या विवाह निश्चित झाला आहे. त्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रांसाठी तयार केलेल्या लग्नपत्रिकेतूनही त्यांनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला आहे. पत्रिकेच्या मुखपृष्ठावरच बिबट्याचे चित्र आहे.

त्याच्याच मागच्या बाजूला वर-वधू, नातेवाईक, लग्नतिथी या संदर्भातील माहिती आहे. याच माहितीच्या खालोखाल पुन्हा वन्यजीवांचे महत्त्व पटवून देणाऱ्या दोन ओळी व हरीण, चिमणी, मधमाशी, वाघ, वाघांचे पंजे यांचे फोटो आहेत. मागच्या बाजूला वाघ वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे. महाभारतात वाघ वने वाचवण्यासंदर्भात दिलेल्या चार ओळींचा आधार घेत हा संदेश पत्रिकेच्या मागच्या बाजूला छापण्यात आला आहे.

समारंभात रोप देऊन स्वागत
> माझे लग्न धुळ्यात आहे. त्यानंतर स्वागत समारंभ जळगावात होणार आहे. या समारंभात पर्यावरणासंदर्भात जागृती करण्याचा संदेश देणारे होर्डिंग्ज लावणे, लग्नात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत रोप देऊन करण्याचा मानस आहे.
- विवेक देसाई, जळगाव

सहा महिन्यांपूर्वी सुचली कल्पना
लग्नासाठी मुली पाहत असतानाच पत्रिकेतून पर्यावरण बचावचा संदेश देण्याची कल्पना सहा महिन्यांपूर्वीच आली होती. मात्र, प्रत्यक्ष लग्न ठरल्यानंतर इंटरनेटवरून अनेक लग्न पत्रिकांचा शोध घेतला. त्यानंतर काही डिझाइनरांना भेटून वाघाचा चेहरा कटआऊट करून पत्रिका तयार करता येईल का, याचा शोध घेतला. डिझाइनरकडून सकारात्मक प्रतिसाद येताच कटआऊट घेऊन तसा डाय तयार करून घेतला व त्यावरच मजकूर छापून पत्रिका तयार केली गेली.