आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 धरणांतील जलसाठा संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी 6 टक्केच जलसाठा शिल्लक असून पाऊस जास्त दिवस लांबल्यास पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. 31 पैकी 18 धरणांमधील उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शंभरावर गावांतील नागरिकांना मृत जलसाठ्यावर तहान भागवावी लागणार आहे. संपुष्टात आलेला जलसाठा पाहता सन 2012 च्या पाणीटंचाईची पुनरावृत्ती होईल, असे दिसते.

जून संपला तरी पावसाचा लवलेश नाही किंवा पाऊस येईल, असे वातावरणही नाही. जुलै महिन्यातही पुरेशा पावसाची शक्यता नसल्याचे मतही जागतिक पातळीवर पर्जन्यविषयक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने जलसाठा राखीव ठेवण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, अधिकृत आदेश नसल्याने शेतीसाठी धरणांतून पाणी उचल सुरूच आहे. सर्वाधिक धरणे असलेल्या जामनेर तालुक्यातील 31 पैकी 18 धरणांमधील उपयुक्त जलसाठा यापूर्वीच संपुष्टात आला असून अन्य पाच धरणांमध्ये नाममात्र जलसाठा आहे. धरणाकाठी शेती असलेल्या अनेक शेतक-यांनी धरणातील पाणी उचल करून बागायत कपाशी लागवड केली आहे. उपसा सुरू राहिल्यास येत्या आठ दिवसांत आणखी पाच धरणांमधील उपयुक्त जलसाठा संपुष्टात येईल, अशी शक्यता पाटबंधारे विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
वाघूर धरणात 76 टक्के जलसाठा
जामनेर शहरासह वाघूर धरणाकाठच्या नेरी, हिवरखेडा, चिंचखेडा, केकतनिंभोरा, पळासखेडा, हिंगणा यांसह काही गावांना वाघूर धरणावरून पाणीपुरवठा होतो. सध्या वाघूर धरणात 76 टक्के जलसाठा असून वाघूर धरणावर विसंबून असणा-या तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नसल्या तरी तालुक्यातील उर्वरित शंभरावर गावांना सन 2012 प्रमाणे ट्रॅँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी सूर, तोंडापूर, पाळधी, मोयगाव, हिवरखेडा, गोद्री व शेवगा या धरणांतील आज असलेला जलसाठा राखून ठेण्यासाठी तत्काळ उपाययोजनांची गरज आहे.
शेतकरी येणार अडचणीत
गेल्या तीन वर्षांपासून कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा विविध परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना पुन्हा उभारी घेण्यासाठी धरणांतील पाणीसाठ्याच्या भरवशावर अनेक शेतक-यांनी कपाशी लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वीप्रमाणेच यावर्षीही भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता धरणांमधून शेतीसाठी होणारा उपसा बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनतीने जगवलेले कपाशीचे पीक सोडून द्यावे लागण्याची वेळ येऊ शकते.
तालुक्यातील पाणीसाठा
लोंढ्री, शेरी, सोनाळा, पिंपळगाव गोलाईत, देव्हारी, शहापूर, वाकडी, कांग, गोंडखेळ (2), सुनसगाव, गोगडीनाला, मोहाडी, माळपिंप्री, भागदरा, चिलगाव, मोयखेडा दिगर, पिंपळगाव, वाकोद, गोंडखेळ (1) व बिलवाडी या धरणांमधील उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला. मोयगाव (10 टक्के), हिज-यानाला (9 टक्के), पाळधी (27 टक्के), सूर (28 टक्के), शेंदुर्णी साठवण तलाव (6 टक्के), तोंडापूर (8 टक्के), हिवरखेडा (31 टक्के), पिंप्री (8 टक्के), गोद्री (10 टक्के), गोंदेगाव (29 टक्के), महुखेडा (6 टक्के), लहासर (8 टक्के), शेवगा (14 टक्के)जलसाठा शिल्लक आहे.
आज बैठक
पाऊस लांबल्याने दिवसेंदिवस पाणीसमस्या गंभीर होत आहे. अजून पाऊस लांबल्यास येत्या काही दिवसांत तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी संबंधित विभागप्रमुखांची आमदार गिरीश महाजन सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक घेणार आहेत.