आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान लाटूनही शाळांकडून अद्याप ग्रंथ खरेदी नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय ग्रंथालय योजनेंतर्गत गेल्या वर्षी 11 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या अटी-शर्तींमुळे शाळांना प्रत्यक्ष ग्रंथ न देता यावर्षी रोख रक्कम वितरीत करण्यात आली. या रकमेतून काही शाळांनी ग्रंथ खरेदी केले असले तरी काही शाळांनी मात्र अद्यापही ग्रंथ साहित्य खरेदी केली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
सर्वशिक्षा अभियान योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांपैकी शालेय ग्रंथालय योजना राबविण्यात येते. यासाठी महाराष्ट्र शिक्षण परिषदेतर्फे निधी देण्यात येतो. या योजनेंतर्गत कोणत्याही राष्ट्रीयकृ त प्रकाशनातर्फे ग्रंथ साहित्य खरेदी करण्याचे निकष आहेत. गेल्या वर्षी परिषदेने राष्ट्रीय पुस्तक प्रकाशन संस्थेकडून पुस्तक खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित प्रकाशन संस्थेचे जिल्ह्यात प्रदर्शन घेण्याचेदेखील नियोजित होते. मात्र प्रकाशन संस्थेने जिल्ह्यात प्रदर्शनच घेतले नसल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शाळांना ग्रंथ मिळू शकले नाहीत. परिणामी सर्वशिक्षा अभियानाने ग्रंथालय योजनेसाठी मंजूर झालेला निधी रोख स्वरूपात शाळांना वितरीत केला. त्यामुळे केवळ निधी वितरीत झाला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक मात्र अद्याप उपलब्ध नाहीत.
समन्वयाचा अभाव - सर्वशिक्षा अभियानांतर्गत अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. परंतु विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच अशा योजना बारगळताना दिसतात. या योजनेचे अनुदान वाटप करण्यात आले असले तरी पुस्तकांसाठी अद्याप विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे. पुस्तकांसाठी योजना असली तरी पुस्तके पोहचविण्यासाठी जबाबदार असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रदर्शन न लावल्यानेच पुस्तके उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी शाळांकडून पुस्तक खरेदी होऊ शकली नाही.
* एनबीटीने जिल्ह्यात प्रदर्शन घेतले असते तर सर्व लाभार्थी शाळांना एकाच ठिकाणी ग्रंथ खरेदी करता आले असते. मात्र एनबीटीने जिल्ह्यात प्रदर्शनच घेतले नसल्याने रोख रक्कम द्यावी लागली. दिलेल्या रकमेतून काही शाळांनी ग्रंथ साहित्य खरेदी केले आहे. - पी.झेड. रणदिवे, सहायक कार्यक्रम अधिकारी, सर्वशिक्षा अभियान
जिल्ह्यात 11 लाख रुपयांचे वाटप - ग्रंथालय योजनेंतर्गत सर्वशिक्षा अभियानातर्फे पुस्तके खरेदी करण्यासाठी 349 शाळांना 11 लाख 10 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात 340 प्राथमिक शाळांना प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात आले. तर नऊ उच्च प्राथमिक शाळांना 10 हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातून स्कूल मॅनेजमेंट कमिटीने ठराव करून शासकीय प्रकाशन संस्थेकडून पुस्तके खरेदी करणे बंधनकारक आहे. पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळांना रोख रक्कम देण्यात आली. मिळालेल्या रकमेतून काही शाळांनी पुस्तके खरेदी केली आहेत. मात्र काही शाळांनी महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या नियमांमुळे वर्ष संपत आले तरी पुस्तके खरेदीच केली नाहीत. त्यामुळे योजनेचा उद्देश फोल ठरत आहे.