आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू उपसा बंदी केवळ कागदावर, बांभोरीचा गिरणा पूल बनला धोकादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुदत संपल्यामुळे वाळू उत्खनन ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हा नियम कागदपत्रांवरच असून दररोज गिरणा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे. या बेसुमार वाळू उपशामुळे बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलाचे िपलर फूट उघडे पडले आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव-गेवराईदरम्यान गोदावरी नदीवरील पूल जसा खचला, तसाच हा पूल खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पुलाविषयी ‘दिव्य मराठी’ने सप्टेंबर महिन्यात वृत्त प्रकािशत केले होेते, तरीदेखील प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाळू उत्खननाची मुदत संपलेली आहे. तरीदेखील वाळू माफियांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. याविषयी बुधवारी ‘दिव्य मराठी’च्या चमूने सावखेडा आणि बांभोरी येथील गिरणा पात्रांवर जाऊन पाहणी केली. या वेळी दोन्ही ठिकाणी मजूर वाळूचे ट्रॅक्टर भरताना दिसून आले. महसूल प्रशासनाने वाळू तस्करांना रोखण्यासाठी आठ विशेष पथक तयार केलेले आहेत. एवढेच नव्हे तर या पथकांना २४ तास अलर्ट राहण्याचे आदेशही दिले आहेत. तरीदेखील भरदिवसा नदीतून वाळू उपसा कसा होतेय? हा आश्चर्याचा प्रश्न म्हणावा लागेल. यावरून महसूल विभागाचे कसे कार्य सुरू आहे, हेही दिसून येते. जिल्‍हा प्रशासनाने नद्या ओरबाडणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

ठोस पावले उचलणार
अवैधवाळू वाहतुकीसंदर्भात दिवसाला एक-दोन ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाळू वाहतूक रोखण्यासाठी तयार केलेल्या पथकांना इतर प्रशासकीय कामांवरही लक्ष ठेवावे लागते, त्यामुळे त्यांना पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी वाळू तस्कर चोरट्या मार्गांनी वाळू वाहतूक करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या पुढे ठोस पावले उचलण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई करून वाळू वाहतुकीला अटकाव करण्यात येईल. गोविंदशिंदे, तहसीलदार