आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूविक्रीला अभय कोणाचे? सुस्तावलेल्या दारूबंदी विभागाचे ‘गौडबंगाल’ कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात नियमबाह्यपणे पहाटे 6 वाजेपासूनच सुरू होणार्‍या दारूच्या दुकानांची पोलिसांनी तपासणी केली होती. फक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अहवाल पाठवण्यावर हे प्रकरण थांबले. मात्र, दारूच्या दुकानांप्रमाणेच रस्त्यावर चौकामध्ये कुठेही उभे राहून दारूचे पेग रिचवणार्‍यांवर कारवाई कधी? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

शहरातील अनेक दारू विक्रीची दुकाने पहाटेपासून सुरू होतात. नियमानुसार दारू विक्री होणारे कोणतेही दुकान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येते. भुसावळात मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अस्तित्त्वात असून नसल्यासारखा आहे. परिणामी दारूची दुकाने सकाळी 10 वाजेऐवजी पहाटे पाच-सहा वाजेपासून सुरू होतात. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या अधिकार्‍यांच्या डोळ्यासमोर हे प्रकार होवूनही कारवाईची हिंमत दाखवली जात नाही. मध्यंतरी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी शिवाजीनगर, स्टेशन रोड, आठवडेबाजार, जामनेररोड परिसरातील पहाटेच दुकाने उघडणार्‍यांना तंबी दिली होती. दुकानासंबंधीचा अहवाल तयार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केला होता. आता या विभागाकडून नेहमीप्रमाणे कागदोपत्री घोडे नाचवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

दरम्यान, केवळ पहाटेच सुरू होणारी दारूची दुकानेच नव्हे तर शहरात काही ठिकाणी हातगाड्यांवर दारूची खुलेआम विक्री होते. भर रस्त्याच्या कडेला उभे राहून मद्यपी पेग रिचवतात. हे प्रकार बंद होणे गरजेचे आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभाग जबाबदारीला बगल देत असल्याने किमान पोलिसांनी पुढाकार घेवून पहाटेच दारूविक्री सुरू करणार्‍यांना समज देण्याचा ‘मोठेपणा’ दाखवला. रस्त्यावरील दारूविक्री थांबवण्यासाठीसुद्धा अशी कृती गरजेची आहे. केवळ अंडापाव विक्रीच्या गाड्याच नव्हे तर काही हॉटेल्स आणि महामार्गांवरील ढाब्यांवर अवैधरीत्या दारूविक्री होते. यामागील नेमके ‘गुपित’ काय? की काही वेगळेच गौडबंगालच आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरातील या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक स्थापन करणार असल्याचे डीवायएसपी विवेक पानसरे यांनी सांगितले.