आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगंधर्व नाट्यगृहात आज रंगणार ‘लिटिल चॅम्प’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शारीरिक व्यंग, विपरीत परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश संपादन करणार्‍या प्रतिभावंत मुलांचा अनोखा असा ‘लिटिल चॅम्प’ कार्यक्रम रविवारी दुपारी 12 वाजता बालगंधर्व नाट्यगृहात होणार आहे.
प्रयास-सेवांकूर या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील काही शहरातील आयडॉल मुलांशी चर्चेचा हा कार्यक्रम आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आपापल्या क्षेत्रात प्रगती करून आनंदी व प्रसन्न जगणार्‍या चेतन उचीतकर, कांचनमाला पांडे, पाणेरी पासड, सुयश खांडेकर आणि राणी दीदी या पाच मुलांना जळगावकरांच्या भेटीसाठी आणण्यात आले आहे.
परिस्थितीविषयी कोणतीही कुरबुर न करता जगायचं कशासाठी आणि कसे हे ठामपणे सांगणारी ही मुलं उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा, नियोजन, व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. अविनाश सावजी हे या मुलांशी संवाद साधून त्यांच्या यशाचे रहस्य उलगडणार आहेत. कार्यक्रमासाठी 10 रुपये देणगी शुल्क आहे. त्या बदल्यात 60 प्रेरणा गीते असलेले पुस्तक दिले जाणार आहे.
हे आहेत खरे ‘लिटिल चॅम्प’
चेतन उचीतकर- वाशीम जिल्ह्यातील साडेसहा वर्षीय चेतन जन्मत: अंध आहे. तरी त्याला दीडशेपेक्षा जास्त कथा सांगता येतात. गणितात तो अतिशय तीक्ष्ण आहे. दिवसभर रेडिओच्या सानिध्यात असल्यामुळे तो देश-विदेशातील घडामोडी, घोटाळे आकडेवारीसह तोंडपाठ सांगतो. त्याच्या या गुणांमुळे वाशीम जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये तसेच संस्थांच्या कार्यक्रमात त्याला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले आहे.
कांचनमाला पांडे- कांचनमाला अमरावतीची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाते. जन्मत: अंध असूनही कांचनमालाने राष्ट्रीय, आंतर रष्ट्रीयस्तरावरील स्पध्रेत अनेक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. लंडन येथे होणार्‍या ऑलम्पिक स्पध्रेसाठी ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
पाणेरी पासड - अमरावतीच्या पाणेरीला लहाणपणापासूनच मेंदूच्या आजारामुळे आधाराशिवाय चालता येत नाही. नीट उभेही राहता येत नाही. बोलताना खूप कसरत करावी लागते परंतु एकदा ती पाण्यात उतरली की, तिला कोणीही थांबवू शकत नाही. जलतरणामध्ये तिने 30 सुवर्ण पदक पटाकाविली आहेत.
सुयश खांडेकर - सुयशच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखाची असल्यामुळे आठवीपासून वृत्तपत्र वाटून घराला हातभार लावला. दहावीमध्ये त्याने 91 टक्के गुण मिळविले आहे. कोणी दिलेल्या मदतीला नम्रपणे नकार देऊन काम मागून त्या पैशांनी शिक्षण व घर चालवित आहे.
राणी दीदी - 15 वर्षीय राणी एचआयव्ही बाधित आईबाबांना बालपणीच पारखी झाली. लातूर येथील सेवालयातील 25 एचआयव्हीग्रस्त मुला-मुलींसोबत राहते. एचआयव्हीग्रस्तांवर प्रेम करा, त्यांना दूर ठेवू नका, असा संदेश देत असते.