आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरवासीयांच्या मानगुटीवर पुन्हा भारनियमनाचे भूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्यातील वीजनिर्मिती घटल्याने भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. याचे पडसाद बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. वीजनिर्मितीमध्ये सातत्याने घट होत असल्याने राज्यासह शहरातही भारनियमनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. सध्या रमजानच्या पार्श्वभूमीवर भारनियमन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी शहरातील संपूर्ण सहा फीडरवर मात्र भारनियमन सुरूच आहे.

भुसावळ अर्थात दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राज्याला दररोज एक हजार मेगावॅट वीजपुरवठा होतो. शहर आणि तालुक्यात मात्र भारनियमनाचा कळस गाठला आहे. शहरातील शांतीनाथ फीडर आणि सिटी फीडरची गळती वाढल्याने भारनियमनाची वेळ साडेपाच तासांपर्यंत पोहोचली. आरएमएस आणि दीपनगर टाऊन फीडरदेखील इ ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्याने भारनियमन वाढले आहे. शहरात झीरो लोडशेडिंग बंद असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दीपनगर केंद्रात सध्या केवळ 1 लाख 11 हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. दररोज 6 रॅक कोळसा मिळणे आवश्यक असताना केवळ चारच रॅक मिळत असल्याने राखीव साठा वापरावा लागतो. दीपनगर केंद्रातून निर्मिती कमी झाल्यास शहराला फटका बसेल. राज्याची वीजस्थिती बिकट झाल्यास शहरातील सर्व फीडरवर एक ते सव्वा तासाने भारनियमन वाढू शकते.