आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारनियमनसह झीरो लोडचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्यातील वीजनिर्मिती आणि विजेच्या मागणीत प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. यामुळे येत्या शनिवारपासून (दि. 28) नवीन वेळापत्रकानुसार भारनियमन होणार आहे.
यापूर्वी विजेचे वितरण आणि थकबाकी वसुलीच्या प्रमाणानुसार विभागणी केलेल्या ए, बी आणि सी ग्रुपमध्ये भारनियमन केले जात नव्हते. क्वचितप्रसंगी झीरो लोडशेडिंग केले जात होते. आता मात्र नवीन निर्णयानुसार झीरो लोडशेडिंगसह ‘ए ’पासून थेट ‘जी 3’ या सर्व ग्रुप्सवर भारनियमन करण्यात येणार आहे. या वेळापत्रकाची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पद्धतीने करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता कार्यालय आणि उपअभियंता कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

शहरातील सहा फीडरपैकी भुसावळ सिटी, एक्स्प्रेस वन या फीडरवर केवळ झीरो लोडशेडिंग केले जात होते. मात्र, आता या फीडरवरही दररोज भारनियमन होईल. ऐन पावसाळ्यातही शहरवासीयांना भारनियमनाचा आणि झीरो लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील एक्स्प्रेस वन, नाहाटा महाविद्यालय फीडर, दीपनगर टाऊन फीडर, आरएमएस फीडर, सिटी फीडर आणि शांतीनाथ फीडरवर आता दररोज वीजभारनियमन होणार आहे.
आदेशाचे काय?
वीज वितरण कंपनीने गेल्या बुधवारी (दि.25) आदेश काढून 29 जून ते 30 जुलैदरम्यान भारनियमन बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यादरम्यानच शुक्रवारी नवीन अध्यादेशाद्वारे संपूर्ण गु्रपवर भारनियमनाचे आदेश प्राप्त झाले. यामुळे रमजानच्या काळात भारनियमन बंद ठेवावे की नवीन आदेशाचे पालन करावे, असा प्रश्न वीज वितरणच्या अधिकार्‍यांना पडला आहे. सर्वच ग्रुपवर भारनियमन होणार असल्याने राज्य भारनियमनमुक्त करण्याची घोषणा हवेतच विरल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. पाऊस लांबल्यास ही स्थिती आणखी बिघडून वीजपुरवठ्यावर परिणाम होईल.
जूनमध्ये पाऊस लांबल्याचा परिणाम
पाऊस लांबल्याने धरणांमधील राखीव पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी वापरता येणार नाही. यामुळे कोयना धरणातून होणारी वीजनिर्मिती थांबली आहे. महाजनकोसह अदानींसारख्या खासगी वीजनिर्मिती संचांमध्ये होणारे बिघाड, कोळशाची टंचाई यामुळे औष्णिक वीजनिर्मितीही कमी प्रमाणात होत आहे. पाऊस झाल्यास कृषी वापराचा पुरवठा कमी होऊन जलविद्युत केंद्रांमधून निर्मिती वाढणार आहे. यामुळे पाऊस लांबल्याचा वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

जनप्रक्षोभ वाढेल, उद्रेक होण्याची शक्यता
शहरातील व्यापारी पेठेसह सर्वच भागात भारनियमन झाल्यास जनप्रक्षोभ वाढू शकतो. एकीक डे वीज कंपनी गळती कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही, तर दुसरीकडे गळती वाढल्याचे कारण पुढे करून भारनियमन लादते. यामुळे शहरवासीयांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकते. असे असले तरी भारनियमनाला एकाही राजकीय पक्षाने विरोध केलेला नाही.
सक्तीच्या सूचना
वीज वितरण कंपनीच्या मुख्यालयातून सर्व विभागांना नवीन वेळापत्रकानुसार भारनियमनाच्या वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही विभागात तफावत आढळून आल्यास वरिष्ठांकडून कारवाई केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर वीज उपलब्ध असतानाही नागरिकांना दिलासा देता येणार नाही.
विजेची बचत करा!
राज्यातील वीजनिर्मितीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. यामुळे वीज कंपनीला नाइलाजास्तव भारनियमनाचा कालावधी वाढवावा लागत आहे. पावसाळ्यात धरणांची जलपातळी वाढल्यावर भारनियमन बंद होईल, अशी आशा आहे. या काळात विजेचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि जपून करावा.
अविनाश साखरे, जनसंपर्क अधिकारी, जळगाव परिमंडळ