आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनमुक्तीच्या प्रस्तावाला ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वीज वितरण कंपनीच्या नियमांनुसार तीन महिन्यांत होणारी वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण यावर भारनियमनाचे ग्रुप विभागले जातात.

यात सर्वसाधारणपणे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ ग्रुपमध्ये समाविष्ट भागात सध्या वीज भारनियमन बंद करण्यात आले आहे. ‘इ’ आणि त्यापुढील ‘जी-3’या ग्रुपपर्यंत भारनियमन केले जाते. 13 मे ते 13 जुलैच्या रिव्ह्यूनुसार शहरात गळतीचे प्रमाण कमी झाले होते. यानंतर ऑक्टोबरमध्ये या रिव्ह्यूच्या अभ्यासावरून भुसावळ एक्स्प्रेस वन, आरएमएस कॉलनी, भुसावळ टाऊन आणि जोगलखेडा या चार फिडरवर भारनियमन कमी होणे आवश्यक होते.

मात्र, वीज वितरण कंपनीने या चारही फिडरवर भारनियमन सुरूच ठेवले आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या स्थानिक प्रशासनाने 25 ऑक्टोबरला मुंबई येथील प्रकाशगड या मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र गळती कमी झाल्यानंतरही चारही फिडरवर भारनियमन केले जात आहे.

वीज वितरणची अशी आहे बनवाबनवी
वीज वितरण कंपनी लॉसेस (गळती) आणि वीजबिलांची थकबाकी वसुली या बाबींचा तीन महिन्यांचा रिव्ह्यू (निरीक्षण ) करून संबंधित ग्रुपवर भारनियमन कमी करणे किंवा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण करते. त्यानुसार गळती अधिक असलेल्या भागांत भारनियमन तत्काळ सुरू केले जाते. मात्र, गळतीचे प्रमाण कमी होऊन थकबाकीची वसुली वाढल्यास भारनियमन बंद करण्याकडे वीज कंपनीतर्फे कानाडोळा केला जातो. गळती अधिक असल्यास भारनियमन सुरू करण्याची प्रक्रिया एकाच दिवसात पार पाडली जाते. तर एखाद्या फिडरवरील भारनियमन बंद करण्यासाठी अधिकार्‍यांना थेट मुंबईपर्यंत प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा लागतो.

लवकरच अंमलबजावणी होणार
भुसावळ शहरातील लॉसेस कमी होऊन थकबाकी वसुली वाढली आहे. तीन महिन्यांच्या रिव्ह्यूनंतर हा प्रस्ताव प्रकाशगड कार्यालयाकडे पाठवला जातो. यावर 15 दिवसांच्या आत अंमलबजावणी होते. मात्र दिवाळीच्या सुट्या असल्याने प्रक्रिया रखडली असावी. यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत असून आठवड्यातच हा अहवाल प्राप्त होईल, अशी आशा आहे. प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता, वीज वितरण कंपनी, जळगाव

मुख्यालयी प्रस्ताव पाठवला आहे
वीज वितरण कं पनीने तीन महिन्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करून चार फिडर भारनियमनमुक्त होण्यासाठी 25 ऑक्टोबरला प्रस्ताव पाठवला आहे. यासंदर्भात निर्णय प्रकाशगड या मुख्यालयातून होईल. चारही फिडर ‘डी’ ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्यास संपूर्ण शहराचे वीज भारनियमन बंद होईल. ए. एन. भारंबे, उपकार्यकारी अभियंता, भुसावळ