आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Election Commission Of India, Divya Marathi

खर्चातील तफावतीने उडवली झोप , दूर करण्यासाठी दिली 48 तासांची मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून सादर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात होणार्‍या खर्चातील तफावत सध्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यंत्रणेच्या अहवालानुसार आलेल्या खर्चाची तुलना करताना निर्माण झालेली तफावत दूर करण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना नोटिसा बजावून 48 तासांची मुदत दिली आहे. तसेच वेळेत खर्च सादर न करणार्‍यांना उमेदवारांनादेखील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मंगळवारी नोटिसा बजावल्या आहेत.


खर्चाची तपासणी करण्यासाठी खर्च निरीक्षकांनी उमेदवारांकडून नोंदवह्या मागवल्या होत्या. तसेच दोन्ही खर्चात असलेली तफावत तपासण्यासाठी सोमवारी सकाळी 10 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत निरीक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी तफावतीबाबत उमेदवारांना 48 तासांची मुदत दिली असल्याने बिले सादर करण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींची धावपळ सुरू झाली आहे. निरीक्षकांनी तपासणी केलेल्या सर्वच प्रमुख उमेदवारांच्या नोंदवहीत तफावत आढळून आली आहे. 14 एप्रिल रोजी याबाबत तपासणी करण्यात आली. त्यात तफावत दिसून आल्याने उमेदवारांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या असून, 48 तासांत तफावत दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांनाही नोटिसा बजावून 18 एप्रिल रोजी खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या दिवशी खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.


निवडणूक निरीक्षकांचा निर्णय अंतिम
आयोगाच्या पथकाकडून आलेला खर्च अंतिम आहे. त्यापेक्षा कमी खर्च दाखवल्यास उमेदवारांना तफावतीचा खर्च सादर करावा लागतो. पथकाच्या अहवालापेक्षा जास्त खर्च असल्यास तो मात्र मान्य केला जात आहे. तफावत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.


खर्च सादन न केल्यास काय होणार कारवाई?
18 एप्रिलपर्यंत खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांच्या प्रचारात वापरल्या जाणार्‍या वाहनांचे परवाने नाकारण्यात येणार आहेत. प्रचाराच्या इतरही परवानगी नाकारण्यात आल्याने उमेदवारांना प्रचार करता येणार नाही. त्यानंतर इतरही कारवायांनाही उमेदवारांना सामोरे जावे लागेल.


सोनाळकरांनी धरले धारेवर
सोमवारी रात्री उशिरापर्यंत खर्चातील तफावतीवर सुरू असलेल्या चर्चेत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी शेखर सोनाळकर यांनी खर्च सादर करण्याच्या पद्धतीबाबत निरीक्षकांना धारेवर धरले. त्यामुळे रात्री 11 वाजेदरम्यान अधिकारी चांगलेच भेदरले होते. तफावतीबाबत अधिकारी आणि सोनाळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे अधिकार्‍यांनी नमते घेतले.


अपक्ष 50 हजारांच्या आत
इतर पक्षीय उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचा खर्च मात्र अजूनही 50 हजार रुपयांच्या आतच आहे. त्यात बहुजन मुक्ती पार्टीचे संभाजी पाटील यांनी 29 हजार 16 रुपये, सय्यद सलीम अलीम यांनी 44 हजार 600 रुपये, गाजी एतेजाद यांनी 14 हजार 150 रुपये, मो. इस्माईल जुम्मन यांनी 39 हजार 800 रुपये खर्च केला आहे.


प्रमुख उमेदवारांचा खर्च
प्रमुख उमेदवारांमधील अमरिश पटेल यांच्याकडून नऊ लाख 29 हजार 987 रुपये खर्च करण्यात आला आहे. त्या खालोखाल डॉ. सुभाष भामरे यांनी पाच लाख सहा हजार 82 रुपये, आम आदमी पार्टीचे निहाल अन्सारी यांनी 65 हजार 158 रुपये आणि अपक्षांमध्ये सर्वाधिक खर्च डॉ. भूपेश पाटील यांनी 86 हजार 221 रुपये इतका केला आहे.


रात्री 12 वाजेपर्यंत चालली तपासणी
सोमवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेली खर्चाची तपासणी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होती. आयोगाच्या पथकाकडून आलेला अहवाल आणि उमेदवारांच्या नोंदवहीतील खर्चात आढळलेल्या तफावतीवर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निरीक्षकांकडे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यातून शाब्दिक चकमकदेखील झाली; परंतु आपल्या भूमिकेवर ठाम राहत निरीक्षकांनी तफावतीच्या रकमेची बिले सादर करण्याचे आदेशही दिले.