आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Jalgaon, Voters, Election Commission Of India

राजकारण्यांच्या खेळीने प्रशासनाचा जीव टांगणीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते विभागली जावीत म्हणून जाती-धर्माचे गणित मांडत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढविणा-या राजकारण्यांनी प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. विदर्भ आणि कर्नाटकातून वेळेत मतदानयंत्रे आली नाही तर लोकसभेची ही निवडणूक कशी पार पाडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका मतदानयंत्रावर जास्तितजास्त 15 उमेदवारांची नावे आणि चिन्हे समाविष्ट करता येतात. त्यामुळे एका मतदारसंघातल्या उमेदवारांची संख्या 15 पेक्षा जास्त झाली तर आणखी एक मतदानयंत्र लागते. 30 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले तर तीन यंत्र लागतात. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी असावी, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांची विभागणी करण्यासाठी जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात प्रमुख उमेदवारांनीच अपक्ष उमेदवारांना पाठबळ दिल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात दोन दोन यंत्रांची गरज भाससार आहे.
जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी 15 पेक्षा कमी उमेदवार असते तर एकेकच यंत्र लागले असते आणि तशी तरतूद जिल्हा प्रशासनाने केली होती; पण विदर्भात उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे तिथे यंत्राची गरज भागविण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने आपल्याकडची जादा यंत्रे तिकडे पाठवली आहेत. मात्र, जळगाव जिल्हय़ातील दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढल्याने इथली गरजही वाढली आहे. आता यंत्रांचा शोध घेत प्रशासन थेट कर्नाटकापर्यंत पाहोचले आहे. मात्र, तिथेही त्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे यंत्रांची जमवा-जमव करतांना निवडणूक यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहेत.
रावेरसाठी इलेक्ट्रानिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर जळगावमध्ये भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड या कंपनीचे मशीन वापरले जाणार आहेत. प्रशासनाला दोन्ही कंपन्याच्या आणखी साडेतीन हजार मशीनची गरज आहे.
वाहतूक खर्च वाढणार : विदर्भातील पाच जिल्हय़ांसह कर्नाटकातून मतदानयंत्र आणण्यासाठी आयोगाला मोठय़ा प्रमाणावर वाहतूक खर्च करावा लागणार आहे.
कामाला होणार विलंब : लांबवरून यंत्रे आणण्यासाठी पाच दिवस लागणार आहेत. त्यांची प्राथमिक तपासणी, दुरूस्ती करून करून योग्य यंत्रावर मतपत्रिका लावून प्रात्यक्षिके घेण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील. त्याशिवाय प्रशिक्षणामध्ये देखील मोठा वेळ खर्ची पडणार आहे.
येथून येणार यंत्र
जळगाव (भारत इलेक्ट्रानिक्स )
मुंबई : 2300 कंन्ट्रोल युनिट
कर्नाटक : 4100 बॅलेट युनिट
आणखी गरज : 1150 बॅलेट युनिट
रावेर (इले. कॉर्पोरेशन, हैद्राबाद)
नागपूर : 600 बॅलेट युनिट
अमरावती : 600 बॅलेट युनिट
अकोला : 200 बॅलेट युनिट
वाशीम : 400 बॅलेट युनिट
यवतमाळ : 600 बॅलेट युनिट
आणखी गरज : 2350 बॅलेट युनिट