आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabhe Election News In Marathi, Election Commission Squad, Divya Marathi

खर्चाची पथकाकडून होतेय चौकशी;जाहीर सभा, प्रचारफेर्‍यांमध्ये आयोगाचे कर्मचारी सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांकडून केला जाणारा दैनंदिंन खर्च आयोगाकडे सादर केला जात आहे. उमेदवाराने सादर केलेल्या खर्चावर डोळे झाकून विश्वास न ठेवता खरंच किती खर्च झाला, याची चौकशी करण्यासाठी आयोगाने विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पथकातील कर्मचारी जाहीर सभा, प्रचार फेर्‍या आणि कार्यकर्त्यांच्या रात्रीच्या जेवणावळ्यांना हजेरी लावून खर्चाचा अहवाल पाठवत आहेत.


उमेदवारांना 70 लाखांपर्यंत खर्चाची र्मयादा वाढवण्यात आली आहे. त्यांनी प्रचारातील दैनंदिन खर्च निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. दररोज खर्च सादर करण्यापेक्षा तो एका-दोन दिवस उशिराने सादर करण्यावर उमेदवारांचा भर आहे. आयोगदेखील त्यांच्या पथकाकडून आलेल्या दैनंदिन अहवालानुसार त्या खर्चाचा हिशेब तयार करीत आहे. आयोगाच्या रेटकार्डनुसार हा खर्च गृहीत धरला जात आहे. आयोगाचे रेटकार्ड, पथकाकडून आलेला अहवाल आणि उमेदवारांकडून आलेला लेखी खर्च, या सर्वांची सांगड घालून तो नोंदवण्यात येत आहे.


खर्चाबाबत नाराजी
अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभांचा खर्च पक्षाच्या नावावर दाखविण्यात यावा, वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातदेखील पक्षाच्या खर्चात गृहीत धरावी, अशी मागणी भाजप आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून करण्यात आली होती. मात्र, त्यास निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयोगाकडून नकार देण्यात आला.


उमेदवारांची डोकेदुखी
आयोगाच्या पथकाने सादर केलेला खर्च आणि उमेदवारांकडून सादर करण्यात आलेला खर्च यात तफावत असू नये, याबाबत उमेदवार जातीने लक्ष घालीत आहेत. गर्दीमध्ये असलेल्या पथकाच्या कार्यकर्त्यांचा शोध घेणे अवघड असल्याने थेट खर्च शाखेकडे जाऊनच दोघांचा खर्च जुळवण्यात उशिराने खर्च सादर केला जात आहे.


आयोगाचे या गोष्टींवर बारीक लक्ष
आयोगाने नियुक्त केलेल्या पथकाकडून उमेदवारांच्या जाहीर सभा, प्रचार फेर्‍या, बैठकांसाठी उपस्थित कार्यकर्ते, लागलेला खर्च, मंडप, चहा, पाणी, जेवण, वाहने, नाश्ता, एक दिवसात फिरलेले अंतर, डिझेल, पेट्रोलचा खर्च या गोष्टींवर लक्ष ठेवले जात आहे. या गोष्टींवर होणार्‍या खर्चाच्या नोंदी, सेवा पुरवणार्‍या संस्था, एजन्सींकडून खर्चाबाबतची माहिती आणि पुरावे म्हणून सभा, प्रचार फेर्‍यांचे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे. हा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च विभागाकडे सादर केला जात आहे.