भुसावळ - राष्ट्रवादीचा महिला मेळावा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत भुसावळच्या लोणारी मंगल कार्यालयात चार दिवसांपूर्वी झाला. जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी या कार्यालयाला ‘युवराज महल’ संबोधले होते. याच मेळाव्यात चिकित्सक वक्ता अशी ख्याती असलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी ‘मनीष कमी वयातच दादा झाला, मोठा झाल्यावर काय म्हणू?’ असे मिश्किल विधान करून हास्याचे फवारे उडवले होते. कदाचित त्यांना यातून राष्ट्रवादीत आधीच एक दादा (अजित पवार) आहे. त्यात जैनांच्या रूपाने दुसर्या दादाची भर पडली, असे म्हणायचे असेल. म्हणून त्यांनी हे मार्मिक विधान केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किंबहुना राजकारणात ‘दादां’च्या भरवशावर राहूनही चालत नाही, कार्यकर्ताही ‘दादा’ असावा लागतो, असंही त्यांना सुचवायचे असेल. सुप्रिया सुळे यांनीही ‘भाऊबीज समजून दोन्ही जण (पालकमंत्री संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी) कामाला लागतील’ असं सूचक विधान केलं होतं. त्यानुसार दोन्ही जण कामाला लागले हे खरे; पण त्या दोघांची तोंड विरुद्ध दिशेलाच आहेत. एवढेच नव्हे तर सावकारे गटाच्या प्रचार कार्यालयाचे तोंड पश्चिमेला तर चौधरी गटाच्या कार्यालयाचे तोंड पूर्वेला आहे. भौगोलिक भाषेत सांगायचं झालं तर एक गट उगवतीच्या सूर्याला तर दुसरा गट मावळतीच्या सूर्याला नमस्कार करणारा आहे. दोघा नेत्यांचे ध्येय राजकीय सूर्याेपासनेचेच आहे. मात्र, या सूर्याच्या उष्णतेत कार्यकर्त्यांवरच होरपळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणूनच तर शहराध्यक्ष युवराज लोणारी एकीकडे तर तालुकाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी दुसरीकडे असे चित्र प्रकर्षाने समोर आले आहे.
नऊचा आकडा जीवनात शुभ
राजकीय, सामाजिक जीवनात कोणत्याही कामाची सुरुवात करताना नऊच्या आकड्याला आपले प्राधान्य असते. राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही म्हणूनच नऊ तारखेला ठेवले. आमचे निष्ठावंत कार्यकर्ते जोपर्यंत कामाला लागत नाही, तोपर्यंतच चिंता असते. ते एकदा का कामाला लागले की मात्र, ‘नो चिंता’ असते.
भाऊ, यांना जवळ घेऊ नका
आपल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हे (अनिल चौधरी) इथं कशाला आले. काय काम आहे त्यांचं या ठिकाणी. कोणी बोलावले रे त्यांना, या ठिकाणी. मी सांगतो भाऊ (एकनाथ खडसे) यांना तुम्ही जवळ करू नका. ते तुमचे नुकसान करतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा थोडासा विचार करा.
जिकडे भुसावळ तिकडे विजय
मनीष जैन अगदी कमी वयातच ‘दादा’ झाला आहे. मोठा झाल्यावर त्याला काय म्हणायचे? असा प्रश्न पडतो. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांचा आशीर्वाद असल्याने त्यांच्यासाठी राजकीय मैदान मारणे काही अवघड नाही. भुसावळ हे शहर किमया करणारे आहे. ते जिकडे झुकते, तो उमेदवार निवडून येतो, हा इतिहास आहे.
तुमची दहा बोटे तुपात राहतील
बारामती मतदारसंघाचा विकास पाहून लोक आम्हाला म्हणतात की, तुमची पाचही बोटे तुपात आहेत. मात्र, जळगाव व रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून दिले तर तुमची दहाच्या दहा बोटे तुपात राहतील. हा आला नाही, तो आला नाही, याला महत्त्व देऊ नका. भाऊबीज समजून दोघांना कामाला लावू.