आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election Issue Congress And NCP Change At Jalna And Raver

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत जालना-रावेरची अदलाबदल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या लोकसभा निवडणुकीत जालना आणि रावेर या मतदारसंघांची अदलाबदल करून झालेली चूक सुधारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरसावली आहे. गेल्या वेळी आघाडीतील समझोत्यानुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर राष्ट्रवादीला तर जालना मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला. मात्र, हा अदलाबदल चांगलाच अंगलट आला. दोन्ही मतदारसंघांत आघाडीचे उमेदवार सपशेल पराभूत झाले. यंदा ही ‘चूक’ सुधारण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्यासाठी जालना पुन्हा राष्ट्रवादीकडे घेऊन रावेर काँग्रेसला सुपूर्द करण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.

कल्याण काळे, पाटील पराभूत
2009 च्या लोकसभा निवडणुकीत जालन्यात काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे भाजपचे रावसाहेब दानवे यांच्याकडून 8 हजार मतांनी पराभूत झाले होते. रावेरमध्ये राष्ट्रवादीचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचा भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी 28 हजार मतांनी पराभव केला. अदलाबदल करूनही आघाडीला दोन्ही मतदारसंघ गमवावे लागले. त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघांची अदलाबदल करून आपापल्या बालेकिल्ल्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हिंगोलीची जागा राष्ट्रवादीकडेच!
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली हिंगोली लोकसभेची जागा कायम ठेवण्याचे आश्वासन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत हिंगोलीच्या शिष्टमंडळाला दिले. ही जागा काँग्रेसला देऊन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर किनवटचे आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील सुमारे 150 जणांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली.

शिष्टमंडळातील सदस्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा कोणत्याही स्थितीत काँग्रेसला सोडू नये, अशी आग्रही मागणी केली. गेल्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असला तरी पक्षबांधणी नव्या जोमाने केली असल्याचे पदाधिकाºयांनी त्यांना सांगितले. उमेदवार निवडीचा अधिकार समितीकडे राहणार असून समितीत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा समावेश असल्याचे शिष्टमंडळातील सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता हिंगोलीची जागा कोणत्या पक्षाला सुटते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अंकुशराव टोपेंसाठी उठाठेव!
यंदा जास्त जागा मिळवण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य असून त्यासाठी दिग्गज मंत्री, नेते रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. जालन्यातून अंकुशराव टोपे यांनी लढावे, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. या जिल्ह्यात पाचपैकी भोकरदन व घनसावंगी हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. घनसावंगीचे आमदार व अंकुशरावांचे पुत्र राजेश टोपे सध्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असून, अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. अंकुशरावांसाठी रावेर परत करण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे संकेत आहेत.