आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी लोकसभा निवडणुकीकरिता अमळनेर प्रशासनाची पूर्वतयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- सन 2014 लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. मतदान केंद्रांसह मतदारांच्या याद्या तयार होत असून अमळनेर विधानसभा (क्रमांक 15) मतदारसंघात यापूर्वी 296 मतदान केंद्र होते आता 300 मतदान केंद्र या निवडणुकीत राहणार आहेत.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात पारोळा तालुक्यातील अनेक गावांचादेखील समावेश होऊन मतदारसंघ तयार झालेला आहे. यात छायाचित्रासह मतदार यादी अपडेट करणे, मृत व्यक्ती, दुबार नावे वगळणे, स्थलांतरितांची नावे वगळणे आदी कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. पालिका निवडणुकीपर्यंत 252 मतदान केंद्र होते. आता एक मतदान केंद्र निवडणूक आयोगाकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात इंदिरा गांधी विद्यालयाचा समावेश आहे. छायाचित्रांसह नव्या याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकारीवर्गाकडून केंद्रांची तपासणी होत आहे. भविष्यात निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नसल्याने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत छायाचित्रासह मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. छायाचित्र जमा न करणार्‍या मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.

हे आहेत मतदान केंद्रांचे निकष
अधिकारीवर्गाला मतदान केद्रांची तपासणी करताना केंद्र सुस्थितीत आहे का? मतदान केंद्राचे ठिकाण मतदान क्षेत्राबाहेर आहे का ? नदी,नाला पार करून मतदानाला जावे लागते का? केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालून जावे लागते का? ग्रामीण भागात दोनपेक्षा जास्त व शहरी भागात दोन पेक्षा जास्त असलेले केंद्रे खासगी इमारतीत आहेत का? पोलिस ठाणे, दवाखाना, मंदिर, धर्मशाळा यापैकी मतदान केंद्र आहे का? मतदान केंद्रानजीक 200 मीटर अंतरावर राजकीय पक्षाचे कार्यालय आहे का? वीज जोडणी, दूरध्वनी जोडणी आहे का? त्याचा क्रमांक अशी तपासणी करून त्याचा तपासणी अहवाल 15 जुलैपर्यंत आयोगाला सादर करावा लागणार आहे.

काम प्रगतीपथावर
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अद्ययावत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 8 जुलै अखेर केंद्र अधिकार्‍यांच्या अहवालानुसार 13 हजार 474 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. मतदारांच्या सोयीनुसार या निवडणुकीत तीन मतदान केंद्र वाढलेले असून एक प्रस्तावित करण्यात आले आहे.
-प्रमोद हिले, तहसीलदार.

अमळनेर विधानसभा मतदार संघातील स्थिती
एकूण गावे-197
एकूण मतदान केंद्र - 299
अमळनेर तालुक्यात केंद्गे - 252
पारोळा तालुक्यात केंद्गे - 47
गत वेळी मतदान केंद्र - 296
वाढलेले मतदान केंद्र - 03
प्रस्तावित मतदान केंद्र - 01
छायाचित्र अपलोड - 5 हजार 146 (8 जुलैअखेर)
वगळणी- 13 हजार 474 ( स्थलांतरित, दुबार, मयत)
मतदार- 2 लाख 62 हजार 845
पुरुष- 1 लाख 38 हजार 083
स्त्री मतदार - 1 लाख 24 हजार 762

अन्यथा कारवाई
मतदान केंद्र तपासणी कामात हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कलम 1950 अन्वये संबंधित अधिकार्‍याविरुद्ध कार्यवाही कारवाई करण्यात येईल.