आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर - म्हसावद-नेरी रस्त्यावरील पळासखेडा मिराचे गावाजवळ काही दरोडेखोरांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान रस्तालूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे नेरीच्या सोनाराचे तीन लाख रुपयांचे दागिने थोडक्यात वाचले. नागरिकांनी तीन किलोमीटर धावून पकडलेल्या एका चोरास जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नेरी येथील रहिवासी असलेल्या मनोज प्रकाश पाटील यांचे जळके (ता.जळगाव) येथे कृष्णा ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. मंगळवारचा आठवडे बाजार आटोपून मनोज पाटील नेरीकडे येत होते. दरम्यान, पळासखेडा मिराचे गावापासून म्हसावदकडे काही अंतरावरील शिव ढाब्याजवळ दबा धरून असलेल्या तीन तरुणांनी मनोज पाटील यांच्यावर काठीने वार केला. पाटील खाली कोसळताच चोरट्यांनी त्यांच्या हातातील दागिन्यांची बॅग घेऊन पळ काढला.
दोन हल्लेखोर पसार
ढाब्यावर बसलेल्या सात ते आठ नागरिकांसह परिसरातील शेतकर्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेतली. जवळपास तीन किलोमीटर अंतर धावून चोरट्यांना पकडले व बेदम मारहाण केली. एकाने पळासखेडा मिराचे गावात फोन करून नागरिकांना कळविले. मारहाण करीत असताना दोन चोरटे पळ काढण्यात यशस्वी झाले असले तरी एकाच्या मुसक्या आवळण्यात नागरिकांना यश आले. हाती लागलेल्या चोरट्यास बेदम चोप देत एका ट्रॅक्समध्ये डांबले. त्यानंतर नागरिकांनी त्या चोरट्यास प्रथम नेरी पोलिस चौकीत व नंतर जामनेर पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी नागरिकांनी वसंता अशोक सोनवणे (वय 22) या चोरट्यास जामनेर पोलिसांच्या स्वाधीन केले.
0 जामनेरा पोलिसात गुन्हा दाखल
0हल्लेखोर बसले होते दबा धरून
0 तीन किमी अंतरापर्यंत पाठलाग
0पोलिसांनी केले नागरिकांचे कौतुक
तिघे चोरटे बोदवडचे
मनोज पाटील यांच्यावर हल्ला करणारे तिघेतरुण बोदवड येथील रहिवासी आहेत. वसंता अशोक सोनवणे यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर वसंता याने गणेश वामन मोरे व सोनू (पूर्णनाव माहिती नाही) या सहकार्यांची नावे सांगितली. सर्व आरोपी बोदवडचे रहिवासी असल्याची माहिती त्याने दिली. चोरटे मनोज पाटील यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा अंदाज नागरिकांसह पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्यापारी जखमी
रस्त्यात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी मनोज पाटील यांच्यावर काठीने जोरदार हल्ला केला. आधीच मोटारसायकलचा वेग त्यात विरुद्ध बाजूने लाठीचा चेहर्यावर जोरदार बसलेला फटका, यात मनोज पाटील जागीच कोसळले व बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाटील यांच्या जाबजबाबानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.