आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाेत्रात प्रेमविवाह केल्याने पाटील कुटुंबावर बहिष्कार, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- एकाच गोत्रातील मुलीशी प्रेमविवाह केल्याने तालुक्यातील करजकुपे येथील नागरिकांनी प्रेमविवाह करणाऱ्या दांपत्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार घातला अाहे. गावात काेणीही बाेलत नाही. काेणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. त्यामुळे जगणे कठीण झाले. कुटुंबीय म्हणतात, अात्महत्या करावीशी वाटते. याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच उपनगर पोलिस ठाण्यात बहिष्कार घालणाऱ्या १२ जणांविरुद्ध तक्रार करण्यात आली. याप्रकरणी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या दांपत्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला अाहे.      


नंदुरबारपासून सहा  किलाेमीटर अंतरावर ४५० लोकसंख्या असलेले करजकुपे गाव आहे. येथील गुजर लेवा पाटीदार समाजातील धनंजय पोपट पाटील या तरुणाने गावातील त्याच समाजाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला. तरुणीने नंदुरबार शहरातील जीटीपी महाविद्यालयातून एमसीएचे शिक्षण घेतले आहे, तर धनंजय शेती करतो. २४ मे राेजी दोघांनी प्रेमविवाह केला. प्रेमविवाह हाेताच प्रेमीयुगुल एकाच गोत्राचे असल्याचा शोध गावातील लोकांनी लावला. गावातील लेवा पाटीदार समाजाच्या १२ जणांनी बैठक बोलावून धनंजय व गायत्री यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. २७ मे रोजी महिलांनी अशाच पद्धतीने बैठक बोलावून धनंजय व गायत्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून गावातील गुजर लेवा पाटीदार समाजातील एकही जण या दांपत्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत नसल्याने त्यांना जगणे कठीण झाले आहे. 


गावातील १२ जणांनी गावकऱ्यांच्या बैठका बोलावून सामाजिक बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावात कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण धनंजयच्या कुटुंबीयांना मिळत नाही. धनंजयची आई सुरेखाबाई यांना आत्महत्या करावीशी वाटत आहे. वडील पोपट पाटील यांच्याकडे २१ एकर शेती आहे; परंतु समाज सामाजिक प्रतिष्ठा द्यायला तयार नाही. गावातील गुर्जर समाजाव्यतिरिक्त या गावात आदिवासी बांधव राहतात. तेच या कुटुंबाशी बोलतात. चार दिवसांपूर्वी उत्तरकार्य झाले. या उत्तरकार्याचे पाटील कुटुंबाला मा निमंत्रण नव्हते.


प्रेमविवाह केला, मात्र गाेत्रच माहीत नव्हते    
आम्ही प्रेमविवाह केला आहे. आमचे गोत्र काय हे मला माहिती नव्हते; परंतु आमच्याच समाजाने आमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला.    
- गायत्री धनंजय पाटील, पीडित पत्नी, करजकुपे    


माझ्याशी काेणीच साधे बाेलतही नाही    
सामाजिक बहिष्कार घालणाऱ्या समाजावर कठोर कारवाई व्हावी. तसेच आम्हाला शासनाने न्याय मिळवून द्यावा. गेल्या सहा महिन्यांपासून मला आत्महत्येचा विचार येत आहे. गावातील कुठलीच महिला माझ्याशी बोलत नाही. जगणे मुश्कील झाले आहे.    
- सुरेखा पोपट पाटील, धनंजयची आई    


पाेलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा  
मुलाने आधी प्रेमविवाह केला. तेव्हा आमचा विरोध होता. आता आम्ही सुनेला स्वीकारले आहे. मुलगा धनंजय व सून गायत्रीसह आम्ही एकत्र राहतो. पण समाजाने सामाजिक बहिष्कार टाकल्याने आम्हाला काहीच सुचेनासे झाले आहे. त्यामुळे मुलाने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केली. आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.    
- पोपट पाटील, धनंजयचे वडील, करजकुप

बातम्या आणखी आहेत...