आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांच्या प्रेमाची आत्महत्येने इतिश्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून कमळीबाई जगताप आणि चुनीलाल चौधरी यांनी आत्महत्या केल्याची घटना साक्री तालुक्यातील शिवखट्याळ येथे घडली. एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह शुक्रवारी आढळून आले. आत्महत्या करणारे कमळीबाई आणि चुनीलाल दोघेही विवाहित होते.

पिंपळनेरपासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या डांगशिरवाडेपासून जवळच शिवखट्याळ गाव आहे. या गावातील रहिवासी मधू वाज्या जगताप शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात आले. पिकांना पाणी देण्याकरिता शेतात आलेल्या जगताप यांना शेतबांधावरील आंब्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह लांबून दिसले. त्यापैकी एक मृतदेह त्यांची सून कमळीबाई टेटीराम जगताप (35) तर दुसरा गावात राहणार्‍या चुनीलाल गोपाल चौधरी (38) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा आवाज ऐकून तसेच मृतदेह पाहून इतर नागरिकही आले. त्यानंतर काही वेळातच पिंपळनेर पोलिस कर्मचारी दाखल झाले. तीन मुलांची आई असलेल्या मृत कमळीबाईचा पती हा वापी येथे कामाला आहे. तर चुनीलाल हा तिच्या घरासमोर राहतो. सुमारे पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याची कुणकुण दोघांच्या कुटुंबीयांना लागली होती, अशी माहिती पिंपळनेर पोलिसांनी दिली. याप्रकरणी मधू जगताप यांच्या माहितीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. ढुमणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक पाटील, संजय अहिरे तपास करीत आहेत.

आत्महत्या पण कशी?
दोघांनी आत्महत्या केलेल्या झाडाजवळ पोलिसांना विषाची एक रिकामी बाटली आढळली. दोघांनी विष प्राशन केल्यानंतर गळफास घेतल्याचा अंदाज आहे. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.