आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना ‘लो’ टेन्शन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होतो. त्याची झलक नुकतीच दिसूनही आली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात क्रॉम्प्टन व जिल्हाभरात महावितरणतर्फे सबस्टेशन, हायटेन्शन, लो टेन्शन, ट्रान्सफॉर्मर, दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात जीवित व वित्तहानी टळावी, अखंडित वीजपुरवठा रहावा यासाठी ही दुरुस्ती केली जाते. सध्या पावसाळी वातावरण झाले आहे. अद्यापही कंपनी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार 30 टक्के कामे होणे बाकी आहेत. ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरात फेरफटका मारला असता, धोकेदायक ट्रान्सफॉर्मर, झाडांच्या न छाटलेल्या फांद्या, वाकलेले खांब, उघड्या डी.पी. असे प्रकार दिसून आले.

एप्रिलपासूनच कामे सुरू
पावसाळ्यापूर्वी कामे एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाली आहेत. तसा अहवाल विद्युत भवन विभागीय कार्यालयास प्राप्त झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरी एक व दोन या दोन्ही विभागात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम खासगी ठेकेदाराकडून केले जात आहे. उर्वरित तांत्रिक कामे क्रॉम्प्टनचे कर्मचारी करीत आहेत. कंपनीकडील चेक लिस्ट मधील 36 पैकी सध्या दुरुस्तीची 24 कामे करण्यात येत आहेत. उर्वरित कामांबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे क्रॉम्प्टनच्या सूत्रांनी सांगितले.

उद्योजकांची मागणी
औद्योगिक वसाहत परिसरात पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे रखडली आहेत. याकडे महापालिका, औद्योगिक विकास महामंडळ व वीज कंपनी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी वीज तारांना अडथळा ठरणारी झाडांची फांदी दूर करणे, वीज तारा बदलणे, पथदिव्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. गटारी तुंबणे, वीजपुरवठा खंडित होणे, या घटना नित्यांच्याच आहेत. परिणामी उद्योग बंद पडून उत्पादनावर परिणाम होतो.


अशी होते दुरुस्ती
0 दुरुस्ती करताना वीज खंडित करतात.
0 कनेक्शनमधील दोष तपासले जातात.
0 तारेखाली येणार्‍या फांद्या तोडतात.
0 ट्रान्सफॉर्मर तपासून दुरुस्त केले जाते


हे करतात दुरुस्ती
0 240 ते 440 व्होल्ट दाबाच्या (लो टेन्शन) तारा आणि वितरण ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती विभागीय कार्यालय करते.
0 33 आणि 11 किलोव्हॅटच्या उच्च्दाबाच्या तारांची दुरुस्ती कंपनीच्या उच्च्दाब दुरुस्ती विभागातर्फे होते.
0 सबस्टेशनच्या उपकरणांची देखभाल सबट्रान्समिशन दुरुस्ती विभाग करतो.


ही झाली कामे
झाडांच्या फांद्या कापल्या 567
डीपीमध्ये ऑइल 256
33 केव्ही इन्शुलेटर बदलले 90
11 केव्ही इन्शुलेटर बदलले 98
खांब बदलले 35
ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल टाकले 300
आयसोलेटर दुरुस्ती 59
ब्रेकर्सची दुरुस्ती 12
बॅटरीचे मेंटनन्स 10


शहर अभियंता मुकेश चौधरी यांना थेट प्रश्न
0 पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात झाली का? दरवर्षी प्रमाणे शहरातील दोन्ही विभागात मान्सूनपूर्व कामे सुरू झाली आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत.
0 अद्यापही अनेक ठिकाणी धोकेदायक डी.पी.लोंबकळणार्‍या तारांसारखे प्रकार दिसून आले आहेत? असू शकतात, काही ठिकाणी कामे झाली नाहीत, त्याचा शोध घेऊन ती पूर्ण करीत आहोत.
0 ब्रेकडाऊन, डीओ जळणे आदी घटना नेहमीच घडतात. पावसाळ्यात काय उपाययोजना आहेत? यासाठी 25 जणांचे पथक कामाला लावले आहेत. यामुळे यावर नियंत्रण आणले जाईल.