आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅस ग्राहकांवर पडतोय व्हॅटचाही भार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर व्हॅटची आकारणी केली जात आहे; मात्र ही रक्कम ग्राहकांकडूनच वसूल केली जात असल्याने ग्राहकांच्या माथीच हा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे ग्राहकाला आता 1100 रुपये प्रतिसिलिंडरसाठी मोजावे लागत आहेत.

व्हॅटसाठी 45 रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांना खिशातून भरावी लागत असल्याने ग्राहक नाराज आहे. तर दुसरीकडे या निर्णयाविषयी शहरातील गॅस वितरकही अनभिज्ञ असून, कंपनीच्या आदेशाप्रमाणे ही आकारणी केली जात असल्याचे ते सांगतात.

एका सिलिंडरची रक्कम आगाऊ : गॅस वितरणप्रणाली अधिकाधिक पारदर्शी करण्यासाठी जिल्ह्यात आॅनलाइन गॅस अनुदान वितरणप्रणाली सुरू आहे. ज्या ग्राहकाने बॅँक व गॅस एजन्सीकडे आधार नोंदणी केली आहे, त्याने सिलिंडरचे बुकिंग करताच त्याच्या बॅँक खात्यावर 450 रुपये जमा होतील. उर्वरित 190 रुपये ग्राहकास सिलिंडर पोहोच झाल्याची संगणकीय नोंद होताच खात्यावर जमा होतील. गॅस ग्राहकांच्या बॅँक खात्यावर सिलिंडरच्या अनुदानाची रक्कम जमा होत असताना पुढील महिन्याच्या एका सिलिंडरची रक्कमही खात्यावर आगाऊ जमा केली जात आहे.

भटकंती मात्र सुरूच : 1 नोव्हेंबरपासून शहरातील ग्राहकांच्या खात्यावर अनुदान जमा होणे सुरु झाले आहे. बुकिंग केल्यानंतर अनुदान बॅँकेत जमा होत आहे. सिलिंडर मिळाल्यानंतर आठ दिवसांत सिलिंडरचे अनुदान जमा होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे अनुदान जमा न झालेल्या ग्राहकांची वितरक व बॅँकेमध्ये भटकंती सुरूच आहे.

ग्राहकांनी ही घ्यावी काळजी : ग्राहकाने गॅस एजन्सीकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावरूनच प्रत्येक वेळी सिलिंडरचे बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण सिलिंडर नोंदणी अधिकृत नोंदवलेल्या मोबाइलवरून न केल्यास नोंदणीत अडथळा येईल. त्यापाठोपाठ बॅँक खात्यावर जमा होणारी अनुदानाची रक्कमही जमा होणार नाही. त्यामुळे मोबाइलचा एकच नंबर बॅँक व एजन्सीकडे नोंदवावा.

बंगळुरूच्या एजन्सीशी करार : भारत गॅस एजन्सीने ऑनलाइन सेवेचा करार बंगळुरूच्या टाटा कन्सल्टसी (टीसीएस) या एजन्सीशी केलेला आहे. त्यामुळे गॅस एजन्सी-बॅँक खाते आणि पुरवठा कार्यालय यांच्यातील सर्व्हरचे नियंत्रण बंगळुरू येथून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा लागेल व्हॅट
अनुदान योजना लागू होण्यापूर्वी ग्राहकांना 446 रुपयांना सिलिंडर मिळत होते. अनुदानामुळे हेच सिलिंडर गेल्या महिन्यात 1025 रुपयांना घ्यावे लागले; मात्र 20 दिवस उलटत नाहीत तोच प्रतिसिलिंडर 1080 ते 1100 रुपयांचा दर आकारण्यात येत आहे. म्हणजे, अवघ्या 20 दिवसांत सिलिंडरची किंमत तब्बल 75 ते 80 रुपयांनी वाढल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनुदानापोटी खात्यात 500 ते 591 रुपये मिळत आहेत; मात्र 46 रुपयांपेक्षाही अधिक फरक ग्राहकांकडून आकारला जात आहे. ही रक्कम व्हॅटची असून, ती कंपनी अदा करू शकणार नाही. ग्राहकानेच हा व्हॅट द्यायचा असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीने हा खर्च व्हॅटच्या रूपाने वसूल केला असल्याच्या तक्रारी ग्राहकांमधून केल्या जात आहेत.