आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदच्या धाडसाने चुकला ‘गोपाळ’चा ठोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वेळ सकाळी 11.15 वाजेची. शहरातील शांतीनगर भागातील गोपाळ अपार्टमेंटमध्ये एकच धावपळ. काय झाले हे समजण्यापूर्वी हृदयाची वाढलेली धडधड. गॅस सिलिंडरला गळती लागल्याने गोपाळ अपार्टमेंटवर ओढावलेली ही आपत्ती सुदैवाने 29 वर्षाच्या तरुणामुळे टळली. आनंद श्रीवंत यांनी दाखवलेल्या धाडसामुळे 40 रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.

शनिवारी सकाळी गोपाळ अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील विरेंद्र पवार यांच्या घरातील गॅस सिलिंडरला गळती लागली. वापरातील सिलिंडर संपल्याने पवार यांच्या पत्नीने नवीन सिलिंडरला रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी सिलिंडरमधून अचानक तीव्र वेगाने गॅस बाहेर पडायला सुरुवात झाली. यामुळे मोठय़ाने आवाज होऊन पवार यांच्या पत्नी घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी अपार्टमेंटमधील इतरांना आवाज दिला. आनंद श्रीवंत यांनी धैर्याने गळती लागलेल्या सिलिंडरला कॅप लावून ते खुल्या जागेत ठेवले. त्यामुळे दुर्घटना टळली.

अन् सुटकेचा नि:श्वास सोडला
- वर्षा गॅस एजन्सीचे मॅकेनिकल सुरेश सोनार यांनी तपासणी करून धीर दिला
- घटनेनंतर अध्र्या तासाने अपार्टमेंटचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला
- धनश्री गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍याने घटनास्थळी सिलिंडर बदलून दिले
- शेजारधर्म निभावल्याबद्दल पवार कुटुंबीयांनी मानले सर्वांचे आभार

असा टळला मोठा अनर्थ
- गॅस गळतीबद्दल समजताच श्रीवंत यांनी संपूर्ण अपार्टमेंटची वीज बंद केली
- पवार यांच्या संपूर्ण घरात गॅस पसरला होता. श्रीवंत यांनी तातडीने लावली कॅप
- धोक्याचा विचार न करता मागील दरवाजाने सिलिंडर खुल्या जागेत ठेवले
- एकमेकांना सतर्क करून सर्व रहिवासी तातडीने घराबाहेर पडले

काळजी घेणे क्रमप्राप्त
घटनेनंतर आम्ही गळती झालेले सिलिंडर बदलून दिले. गॅस वापरताना ग्राहकांनी काळजी घ्यावी. ठरावीक कालावधीनंतर नळी बदलून घ्यावी. सिलिंडर लावताना अथवा इतरवेळी शंका आल्यास माहिती द्यावी. रवींद्र शिंदे, संचालक, धनश्री गॅस एजन्सी

माणुसकी महत्त्वाची
माणुसकीच्या भावनेतून शेजारधर्म निभावला. सिलिंडरमधून बाहेर येणारा गॅस पाहता खरे तर घाबरलो होतो. मात्र, परिणामांची जाणीव होताच धैर्याने गळती होणार्‍या सिलिंडरला कॅप लावून ते बाहेर आणून ठेवले. आनंद श्रीवंत, रहिवासी, गोपाळ अपार्टमेंट

मोठी आपत्ती टळली
सुदैवाने देवघरात पेटता दिवा नव्हता, अन्यथा अनर्थ घडला असता. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आमच्या परिवारावरील मोठी आपत्ती टळली. मदतीसाठी धावणार्‍या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. विरेंद्र पवार, रहिवासी, गोपाळ अपार्टमेंट

‘दिव्य मराठी’तून माहिती
‘दिव्य मराठी’कडून माहिती मिळताच तातडीने मॅकेनिकलला रवाना केले. आमच्या एजन्सीचे सिलिंडर नसले तरीही समोर आलेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी माणुसकीच्या भावनेतून मदत महत्त्वाची आहे. प्रश्न शेवटी जीवनाचा असतो. दीपक महाजन, संचालक, वर्षा गॅस एजन्सी