आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्य शासनाने नगराध्यक्ष निवडीबाबत मुदतवाढीचा निर्णय मागे घेतल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवड लवकरच होण्याचे संकेत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळात शांतता निर्माण झाली होती. मात्र, शासनाच्या मुदतवाढ मागे घेण्याच्या निर्णयाने राजकीय वातावरण पुन्हा तापणार असून घोडेबाजाराला पुन्हा ऊत येणार आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून 24 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी धडपड सुरू आहे.

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदी उमेश नेमाडे विराजमान झाले होते. 26 जून 2014 रोजी त्यांच्या अडीच वर्षांचा कालावधी संपला. यापूर्वी शासनाने नगराध्यक्ष निवडीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बुधवारी हा निर्णय रद्द करून दिलेल्या मुदतीमध्येच निवडणूक घेण्यासंदर्भात विचार झाला. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री संजय सावकारेंच्या गटाकडून युवराज लोणारी प्रबळ दावेदार आहेत. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिलेल्या शब्दामुळे त्यांची या पदावर वर्णी लागेल, असे संकेत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला असल्याने पालिकेवर पालकमंत्र्यांच्या गटाकडून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाकडून मुस्लिम उमेदवाराला नगराध्यक्षपदाची संधी मिळेल, असे जाहीर केले आहे. नगरसेविका तरन्नुम इद्रिस यांना नगराध्यक्ष तर नगरसेवक विजय चौधरी यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळू शकते. आगामी काळात होणा-यानगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना लक्ष्मीदर्शनाची आशा आहे.

भाजप, आघाडी किंगमेकर
पालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रवादीमध्येच पालकमंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वतंत्र गट सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, दोन्ही गटांना भाजपचे 11 आणि खान्देश विकास आघाडीच्या 8 मतांशिवाय मॅजिक फिगर गाठून सत्ता स्थापन करणे शक्य नाही. खाविआ आणि भाजप या निवडणुकीत किंगमेकर ठरेल.

हालचालींवर लक्ष
शहरात सध्या तळ्यात मळ्यात असलेल्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. सध्या आपल्या गटासोबत फिरतो मात्र ऐनवेळी कोणाकडे जाईल? याची शाश्वती नसलेल्या नगरसेवकांना सर्वप्रथम सहलीवर पाठवण्याचे नियोजन होऊ शकते. आठवडाभरात दोन्ही गटांकडून नगरसेवकांची सहल निघण्याची शक्यता आहे. यासाठी काहींनी बुधवारपासूनच नियोजन सुरू केले आहे.
लोणारींना सहल पथ्यावर
नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे लोटली गेल्यानंतरही प्रबळ दावेदार युवराज लोणारी यांनी 13 नगरसेवकांना तिरुपती, रामेश्वर आणि दक्षिण भारतातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवले. गेल्या 28 जून रोजीच 13 नगरसेवक सहलीवरून भुसावळात दाखल झाले. यानंतर आता पुन्हा नगराध्यक्षपदाच्या निर्णयाची मुदतवाढ मागे घेतली जाणार असल्याने लोणारींना सहल पथ्यावर पडणारी ठरू शकते.