आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाच्या ज्वलनानंतर अँश पाँडमध्ये सोडल्या जाणार्या राखेतील वरच्या थरापासून (सेनोस्फिअर) आता महाजनकोला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी पाहता मुख्यालयातून सेनोस्फिअरलाच्या विक्रीसाठी टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना या मुळे महिन्याला किमान 10 कोटींचे उत्पन्न मिळेल.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 600 सेंटिग्रेड उच्चांकी तापमानावर कोळसा जाळल्यानंतर निर्माण होणार्या राखेची अँश पाँडवर विल्हेवाट लावली जाते. पाँडमध्ये साचून राहिलेल्या राखेवर अँल्युमिनिअम आणि सिलिकॉचा अत्यंत बारीक थर साचतो. या राखेच्या थराला सेनोस्फिअर असे संबोधले जाते. पाँडमध्ये सोडलेल्या या घटकापासून महाजनको प्रशासनाला एक रुपयाचेही आर्थिक उत्पन्न नव्हते. दुसरीकडे राखेतील हा घटक अत्यंत बारकाव्याने शोधून त्याची 100 ते 150 रुपये किलोप्रमाणे विक्री करणार्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या.
मात्र, गेल्या वर्षभरापासून ऑटोमेटिव्ह, पेंट, विमान बांधणी, टाइल्स, सिमेंट आणि वस्त्रोद्योगात सेनोस्फिअरला मागणी वाढल्याने त्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी महाजनकोचे प्रयत्न आहेत. व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी या संदर्भात निर्णय घेतला असून चंद्रपूरच्या पथदर्शी प्रयोगानंतर आता राज्यभरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून टेंडर पद्धतीने या महत्त्वपूर्ण घटकाची विक्री होणार आहे.
काय आहे सेनोस्फिअर?
कोळशाच्या ज्वलनानंतर सिलिकॉन आणि अँल्युमिनियम या धातूंच्या संयोगाने सेनोस्फिअरची निर्मिती होते. करड्या रंगाच्या या उपपदार्थाची घनता 0.4 ते 0.8 ग्रॅम/सेमी आहे. आकाराने अत्यंत सूक्ष्म, कठीण, ताठर, प्रकाश आणि जलरोधक असलेल्या या पदार्थाचा वापर औद्योगिक क्षेत्रात वाढला आहे. विद्युत चुंबकीय परीक्षणासाठी भविष्यात वापर शक्य असल्याने महाजनकोने टाकाऊ पदार्थ असलेल्या सेनोस्फिअरची टेंडर काढून विक्रीचा निर्णय घेतला आहे.
प्रतिसाद मिळेल
सेनोस्फिअर विक्रीसाठी लवकरच टेंडर निघेल. औद्योगिक वापर जास्त असलेल्या ठिकाणी टेंडरला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. टाकाऊ पदार्थ असलेल्या या घटकापासून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न आहेत. आर. आर. बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर प्रकल्प
रोजगार मिळेल
स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी महाजनकोने सेनोस्फिअरचे टेंडर बेरोजगारांच्या संस्था किंवा ग्रामपंचायतीला द्यावे. या मुळे प्रदूषणाने बाधित गावांचा विकास साधता येईल. राजेंद्र चौधरी, पर्यावरण अभ्यासक, फुलगाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.