आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने महाजन-खडसे गटबाजीचे निदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येत्या तारखेला शहरात होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे या जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांमधील गटबाजीचेच ‘निदान’ झाले आहे. भाजपच्या या दोन नेत्यांमधील गटबाजी राज्यात सत्तेवर आल्यानंतर छुपेपणाने दिसत होती. आता महाशिबिराच्या निमित्ताने प्रथम गटबाजीचेच‘निदान’ झाले. अगदी शहरात लावलेल्या मोठमोठ्या फलकांपासून ते थेट नियोजनापर्यंत ही उभी फूट पडल्याचे दिसत आहे. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी, नगरसेवक तर या महाशिबिरापासून चार हात लांबच आहेत. तसेच खडसेंचे राजकीय हाडवैरी माजी आमदार सुरेश जैन यांची खान्देश विकास आघाडी आणि महसूलमंत्र्यांपासून दुरावलेल्या मनसेचे नेते या निमित्ताने महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून महाआरोग्य शिबिराच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत.

गिरीश महाजन यांनी जानेवारी रोजी सागर पार्क मैदानावर भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. मात्र, खाविआ मनसे वगळता भाजपच्या नगरसेवकांनी या शिबिरानिमित्त आयोजित बैठकीला दांडी मारली आहे. त्याचबरोबर गुरुवारी ते प्रभागात रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यालाही भाजप नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, कैलास सोनवणे यांच्यासह खाविआचे नगरसेवक उपस्थित राहिले. त्याचबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. एकंदरीत या भव्य आरोग्य शिबिराच्या निमित्ताने खडसे महाजन यांच्यातील गटबाजीचे निदान झाले.
सुरेश जैन यांचा शहरावर एकछत्री अंमल होता. घरकुल घोटाळ्यामुळे ते तुरुंगात गेल्यानंतर शहरातील शिवसेनेला कुणी वाली राहिला नाही. त्यांच्या खान्देश विकास आघाडीची धुरा रमेश जैन यांच्याकडे आली. सुरेश जैन एकनाथ खडसे यांच्यात पक्के राजकीय शत्रुत्व आहे. खडसे यांच्या वाढदिवसाला रमेश जैन यांनी त्यांची भेट घेऊन दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सभेत खडसे यांनी त्यांचा मुलगा निखिल यांच्या विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचे शल्य जाहीर बोलून दाखवले. त्यामुळे सुरेश जैन यांच्याशी असलेले त्यांचे राजकीय वैर ते विसरले नसल्याचे सिद्ध झाले. त्यातच खाविआबाबत शिवसेनेत फारच आलबेल वातावरण आहे, असे नाही. त्यामुळे भव्य आरोग्य शिबिराच्या निमित्ताने गिरीश महाजन यांच्याशी जवळीक साधून खाविआने त्यांच्या ‘मैत्र जीवांचे तिमीर जावो,’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

पोश्टर बॉय
महाशिबिराच्या निमित्ताने शहरात मोठे फलक लावण्यात आले आहेत.या फलकांवर शहर अथवा जिल्हा भाजपतील नेत्यांऐवजी महाजन यांच्यासोबत माजी आमदार सुरेश जैन यांचा फोटो आहे. शिवाय खालच्या बाजूस महापौरांसह खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांचे छायाचित्र आहे. एका फलकावर महाजनांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. या सर्व फलकांवरून पालकमंत्री एकनाथ खडसे गायब आहेत हे विशेष.

नवे राजकीय समीकरण
मनसेचेललित कोल्हे आणि एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. या मैत्रीखातर ललित कोल्हे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांना जाहिर पाठिंबा देऊन मित्रनिष्ठा जपली. यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ललित कोल्हे यांनी वेगळी समीकरणे मांडली होती. यासाठी खडसे सर्वप्रक्रिया घडवून आणतील, अशी त्यांना अपेक्षा होती. ऐनवेळी सुरेश भोळे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. येथूनच ललित कोल्हे यांची घोर निराशा झाली अन् ललित कोल्हे हे खडसे यांच्यापासून दुरावले. त्यानंतर दसऱ्याच्या रावण दहनानिमित्त गिरीश महाजन यांचा मनसेच्या बॅनरवर फोटो झळकला. मनसेची महाजन यांच्याशी जवळीक वाढली. अाता ती भव्य आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दृढ झाली.