आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजश्रृंगारांनी नटलेल्या गौरींचे आगमन ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा; सोन्याच्या पावलानं लक्ष्मी आली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या आठवड्यात श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर मंगळवारी ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थातच गौरींचे आगमन झाले. साजश्रृंगारांनी नटलेल्या या गाैरी, महालक्ष्मी पूजन भाेजन बुधवारी हाेणार अाहे.
 
मंगळवारी गौरींकरिता मुखवटे, पाऊलं, बाळ याशिवाय लक्ष्मीच्या साजाची खरेदी करण्यात आली. काही ठिकाणी पितळाचे तर काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे असलेल्या गौरी असून काही घरांमध्ये केवळ खडे मांडूनही गौरींची स्थापना केली जाते. ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली, सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, असे म्हणून आणि उखाणे घेत ज्येष्ठा-कनिष्ठांचे हळदी-कुंकू लावून, वाजत-गाजत सुवासिनी स्वागत करीत असतात. 
 
पौराणिक आख्यायिकेनुसार श्रीगणपतीच्या आगमनानंतर भावाच्या भेटीसाठी ज्येष्ठा-कनिष्ठा या तीन दिवस माहेरी येत असतात. गौरी बसणाऱ्यांच्या घरी संपूर्ण कुटुंब पूजनासाठी एकत्रित जमते. या गौरींसाठी स्टॅण्ड उभे करण्यात येते. तसेच धड उभारुन, साड्या नेसवण्याकरिता घरातील सुवासिनींचा चांगलाच कस लागत असताे. 

मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर दुपारपर्यंत अनेकांकडे गौरी साजश्रृंगाराने विराजमान झाल्या होत्या. ज्येष्ठ गौरींचे बुधवारी पूजन असून त्यानंतर पंचपक्वान्न तयार करून १६ भाज्यांचाही समावेश करून पाहुणचार करण्यात येणार आहे. यासाठी बाजारपेठेत १६ भाज्यांचे वाटे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी गौरींचे हळदी-कुंकवाचे देखील आयोजन करण्यात आले असून उत्सवाप्रमाणे गाैरी-गणपती साजरे केले जातात.
 
तिसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी या ज्येष्ठा-कनिष्ठा पुन्हा सासरच्या प्रवासाला निघतात. लक्ष्मींच्या पूजेचे विसर्जन करून अनेक घरांमध्ये श्रीगणपती बाप्पाचेही विसर्जन करण्यात येते. यामुळे घराघरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 
 
१६ भाजी अन‌् आंबिलचा प्रसाद 
ज्येष्ठा-कनिष्ठांचेआगमन झाल्यानंतर पाहुणचारामध्ये १६ भाज्यांना एकत्रित करून एक भाजी करण्याची पद्धत आहे. याकरताि बाजारांमध्ये भेंडी, गिलके, तोडली, कोबी, गवार, कटुले यासारख्या भाज्यांचा समावेश वाट्यात होता. सोबतच आंबिलच्या प्रसादाचादेखील पंचपक्वान्नांमध्ये समावेश असतो. याशिवाय करंजी, पुऱ्या, लाडूचा फराळ देखील तयार झाला असून गौरी पूजनाप्रसंगी फुलोरा लावण्यात येताे. तर पुरणाच्या पाेळीचा मुख्य नैवेद्य या वेळी गाैरीला दिला जाताे. 
बातम्या आणखी आहेत...