Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Mahanor Left House Due To Dirtyness

स्वच्छतेचे अॅम्बेसेडर कवी महानाेरांना घाणीमुळे साेडावे लागले स्वत:चे घर!

चरणसिंग पाटील | Oct 12, 2017, 03:00 AM IST

  • स्वच्छतेचे अॅम्बेसेडर कवी महानाेरांना घाणीमुळे साेडावे लागले स्वत:चे घर!
जळगाव - जळगाव शहरातील भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर मुद्दा बनल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या व इतर अाजारांचे रुग्ण प्रचंड वाढले अाहेत. त्याचा फटका शहराचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर, पद्मश्री कविवर्य ना. धाें. महानाेर यांनासुद्धा बसला अाहे. सलग तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही अादर्शनगरातील त्यांच्या घराजवळील परिसर स्वच्छ हाेत नसल्याने स्वत:चे घर साेडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ महानाेरांवर अाली अाहे. यासंदर्भात महानाेर यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...

जळगावातील भूखंडावरील अस्वच्छता हा अतिशय गंभीर विषय झाला अाहे. प्लाॅटचे दर वाढवण्यासाठी काही श्रीमंत गुंतवणूकदार जागा घेऊन ठेवतात. त्या जागांवर बांधकामही करत नाहीत अाणि ही जागा विकतही नाहीत. मी अादर्शनगरात गेल्या १२ वर्षांपासून राहताे. घर घेण्याच्या १० वर्षांपूर्वीपासून शेजारचा खुला भूखंड तसाच अाहे. माझ्याकडे अनेक मंत्री, साहित्यिक, कलावंत, अभिनेते अनेकदा येऊन गेले. त्यांनादेखील शेजारच्या प्लाॅटमधील घाणीमुळे हाेणारा त्रास सहन करावा लागला अाहे. शेजारी लाेक या खुल्या जागेत कचरा व शिळे अन्नपदार्थ टाकून माेकळे हाेतात. यामुळे गुरे व कुत्र्यांचा वावर या ठिकाणी असताे. कुत्र्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागताे. घराजवळील शाळेची घाणदेखील याच ठिकाणी टाकली जाते. त्यामुळे शाळेत मुलांना ने-अाण करणारे पालकही परिसरातून जाताना नाकाला रुमाल बांधून जातात. दाेन-तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर व पाेलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे येऊन गेले. त्यांनीदेखील ही परिस्थिती अनुभवली. त्यांनी शाळा प्रशासनाला तंबीदेखील दिली. काही दिवस सुरळीत चालले; परंतु पुन्हा ताेच त्रास सहन करावा लागताेय. जागा मालकदेखील काही करत नाही.’

भाड्याच्या घरात अाश्रय
शहरातील स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या माझ्यासारख्या माणसाला हा त्रास अाहे, तर सर्वसामान्यांचे काय हाेत असेल? खरं तर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत काहीही हाेत नाही. नावालाच ब्रँड अॅम्बेसेडर अाहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शहर व ग्रामीण भागासाठी स्वच्छतेचा संदेश देणारी कविता माझ्याकडून लिहून मागवली. तीन कडव्यांतील ही कविता राज्यातील अन्य शहरांत वापरली गेली. परंतु जळगाव शहरात त्याचा काहीही उपयाेग केलेला दिसत नाही. अस्वच्छतेचा त्रास असह्य झाल्याने मी स्वत:च्या हक्काच्या घराला कुलूप लावून महिनाभरापासून परिवारासह रायसाेनीनगरातील भाड्याच्या घरात राहत अाहे.

Next Article

Recommended