आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तसेच पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत. राज्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार असून निवडणुकांपूर्वी मनसे ती जाहीर करणार आहे, असे पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
मनसेच्या मेळाव्यासाठी शहरात आले असता त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांच्या भोंगळ नेतृत्व आणि अपयशी कारभारामुळे येणा-या काळात मनसे हा उत्तम पर्याय समोर येत असल्याचे संकेत त्यांनी दिले. पक्षाच्या पदाधिका-याच्या राज्यभरात सुरू असलेल्या दौ-या निमित्त मतदारच मनसेसोबत जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात मतदारांच्या फार अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनच सध्या पक्षाचे कार्य सुरू आहे. येणा-या निवडणुकीत मनसे जर राज्यात सत्तेवर आली तर आश्चर्य वाटायला नको, असा ठाम विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
आमदार दरेकर यांनी मांडलेले राजकीय मुद्दे
*मोठ्या शहरानंतर आता मनसे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील आहे. थेट संवाद साधून तरुण उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने काम सुरू झाले आहे.
*पक्षामध्ये महिला उमेदवारांचा तुटवडा असला तरी काम करणा-या कर्तृत्ववान महिलांनाच उमेदवारी दिली जाईल. महिलांनी पक्षात यावे यासाठी राज्यपातळीवर महिला आणि युवतींसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
*इतर पक्षातील पदाधिका-याना मनसेत प्रवेश देण्यासाठी पक्ष इच्छुक नाही. मात्र इतर पक्षांतील चांगले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षात येत असल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल. उमेदवारी देताना मात्र मनसेने सुरू केलेल्या परीक्षा आणि मुलाखतींचा पॅटर्न कायम राहील.
*मनसेकडे सध्या युवकांचा ओढा जास्त आहे. त्याचा धसका घेऊनच युवा सेनेने युवकांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र खरी परिस्थिती पाहिली तर मनसे हा युवकांसाठी योग्य पर्याय आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युवा चेह-याना जास्त संधी देत आहेत.
*यापुढे राज्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभासह सर्वच निवडणुकांत पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तालुका, जिल्हा कार्यकारिणी आणि पक्षप्रमुख यांच्यात साखळी निर्माण केली जात आहे.
विरोधी पक्ष दुबळा; सरकारचे फावले
राज्यात भाजप, शिवसेना या विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या गटबाजीमुळे बेरोजगारी, वीज, पाणी, दुष्काळ या समस्यांवर सरकारला कोंडीत पकडले जात नाही. विरोधी पक्ष आक्रमक नसल्यामुळे राज्य विकासकामांसह प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. मनसेला हीच कामे करायची असल्याचे दरेकर म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.