जामनेर - जामनेरमध्ये एका स्विफ्ट कारमधून ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी ही रक्कम आयकर अधिका-यांकडे सुपूर्द केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नेमलेल्या पथकाकडून वाहनांची रविवारी जामनेरात तपासणी केली जात होती. या वेळी जामनेरकडून पाचो-याकडे जाणा-या स्विफ्ट कार तपासणीसाठी थांबविण्यात आले. या वेळी अश्फाक रसूलखान पठाण व शेख मुक्तार शेख सत्तार यांनी तपासणीवरून हुज्जत घातली.
अधिका-यांनी कारवाईचा धाक दाखवताच बॅगमध्ये ५० लाख रुपये असल्याचे उभयतांनी सांगितले. मात्र, हे पैसे धरणगाव येथील एस. के. कॉटन इंडस्ट्रीजचे असल्याचे सांगून जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, पाचोरा अशा ठिकाणच्या व्यापा-यांना वाटप करत चाललो असल्याचे सांगितले. पथकाने वाहनासह रक्कम तहसील कार्यालयात आणून आयकर अधिका-यांच्या स्वाधीन केली.
ही कारवाई पथकप्रमुख बी. डी. पाटील यांच्यासह एस. एम. कुलकर्णी, आर. बी. माळी, एस. व्ही. सोनवणे, देवेंद्र राजपूत यांनी केली.
बदनामी टळली...
पाचोरा रोडवर पकडण्यात आलेल्या दोघांनी बॅगमध्ये ५० लाख रुपये असल्याचे सांगितले. पंचनामा करतानापाच बंडल सुटे त्यातील एका बंडलात ४९,५००च रुपये भरले. पुन्हा ते मोजले असता त्यात काही नोटा कमी आढळून आल्यात. यामुळे ५० लाख रुपये गृहीत धरून ताब्यात घेतलेले सर्व बंडल तपासले असता ४९ लाख ८८ हजार रुपयेच असल्याचे आढळून आले. ५० लाख पंचनामा झाला असता तर १२ हजार रुपये कमी पडले असते.