जळगाव- महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे सुरू असलेल्या कलांगण या कार्यक्रमात रविवारी लोककला प्रकारात जागरणातील ‘खंडोबाचे लगीन’ साेहळा सादर करण्यात आला. याप्रसंगी खंडोबाचे लगीन सोहळा या नाट्यात पर्यावरण संदेश, माेबाइल, इंटरनेटच्या आहारी गेलेली पिढीसारख्या सामाजिक विषयांना हात घालण्यात आला. पारंपरिकतेचे महत्त्व अबाधित राखत आधुनिकतेची सांगड या जागरण कलाप्रकाराला तरुणांनी घातली आहे.
या वेळी जळगावातील नागरिकांना लोककलेची मेजवानी मिळाली. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला गुरू थिएटर ग्रुपतर्फे या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. मे पासून या उपक्रमास महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. जळगावातही या उपक्रमाची सुरुवात झाली असून आतापर्यंत शाहीर, भारुड यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. काव्यरत्नावली चौकात दर रविवारी संध्याकाळी ते या वेळेत हा कार्यक्रम सादर करण्यात येताे. यंदा कलांगण जागरणाने भरले होते. या वेळी जिल्हा समन्वयक विनोद ढगे उपस्थित होते. महाराष्ट्राची परंपरा, लाेककलेचा प्रसार, प्रचार व्हावा, यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ढगे यांनी सांगितले.
कलावंतांनी गायली खंडोबाची महती
पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागात हा कार्यक्रम झाला. यात पूर्वरंगात वाद्यांची जुगलबंदी, नमन, गण, ३३ काेटी देव देवतांना आवाहन, खंडोबाचा महिमा, वाघ्यांचा भारुड, वाघ्यांचा महिमा, मुरळींचे आगमन, मुरळी कथा महिमा, सवाल जवाब, ‘मल्हार वारी’,‘म्या पाहिला पिवळा झेंडा’ हे मुरळीचे गीते, उत्तरंगात खंडाेबाचे लगीन सादर करण्यात आले. यात सागर जाेशी, राजेश जगताप, अण्णासाहेब इंदेलकर, जयदीप ठाकरे, बापुसाहेब पाटील, पूजा सावंत, अश्विनी वाव्हळ, स्वप्नाली तायडे, समृद्धी कामठे या कलावंतांनी सहभाग नोंदवला.