आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Polls: Major Players Tussle Over Seat Sharing

पंकजा मुख्यमंत्री अन‌् मी गृहमंत्री; विनोद तावडे यांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - ‘राज्यात आगामी सरकार हे महायुतीचे येणार आहे यात आता शंका नाही. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान पंकजा मुंडे यांना मिळेल, तर नव्या सरकारमध्ये मी गृहमंत्री असेल,’ असे भाकीत भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी वर्तविले, तर ‘लोकसहभागातून सुरू झालेल्या माझ्या संघर्ष यात्रेतून बाबांचे सत्ता बदलाचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसत आहे,’ असे वक्तव्य भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंकजा पालवे यांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शुक्रवारी चाळीसगावातून सुरू झाला. यावेळी विनोद तावडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता वाघ, प्रदेश उपाध्यक्ष गिरीष महाजन, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील सर्व घोटाळयांचे मुळ सिंचन घोटाळाच असल्याचे सांगत पंकजा यांनी आघाडी सरकारवर हल्ला चढवला. महाभारतातील कथानकाचा संदर्भ देत ‘आज आपण अर्जुनाच्या भूमिकेत असून कौरवांचा नाश करायचा आहे, याचा संकल्प करा’, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

‘बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार, राज्यातील आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार यास जनता कंटाळली आहे. त्यामुळे आता सामान्य जनतेलाही संघर्षातून बाहेर पडून ‘अच्छे दिन’ आणायचे आहेत. ४३ उद्योग राज्याबाहेर गेल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. शेती कनिष्ठ, नौकरी उत्तम तर व्यापार मध्यम वाटत आहे. याचाच अर्थ तरूणाईला कोणतीच दिशा न देता त्यांना भरकटत ठेवण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळेच हे सरकार आता आपल्याला घालवायचे आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार : तावडे
विनोद तावडे यांनीही आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. ‘राज्याच्या प्रत्येक नागरिकावर आघाडी सरकारने २७ हजार ४५० रूपयाचे कर्ज करून ठेवले आहे. भ्रष्टाचारी आघाडी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणविस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुटीवार व आपण स्वत: २० सप्टेंबर पासून राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणाही तावडे यांनी केली.

आघाडीचे घाईघाईचे निर्णय रद्द करणार
महायुतीचे शासन आल्यास कृषी अधिकार्‍यांचा सीआर ग्रामसभेकडूनच करून घेतले जाईल. त्यामुळे भ्रष्टाचाराला वेसन बसेल. आघाडी सरकारने घाईघाईने व मतदारांना खूष करण्यासाठी घेतलेले काही निर्णय रद्द करणार असल्याचा पुर्नरूच्चार त्यांनी केला. अजित पवार यांनी सिंचन घोटाळयातून राज्याला लुटले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसे, गिरीश महाजनांसाठी जागा सोडा
संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता पंकजाताई राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे सुचक व्यक्तव्य त्यांनी केले. प्रदेश उपाध्यक्ष गिरीष महाजन यांच्याकडे स्मित हास्य करून त्यांनी ‘मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ खडसे व गिरीष महाजन यांच्यासाठी जागा सोडा’, असे सांगून उपरोधिक टोला लगावला. तर आपण मात्र गृहमंत्रीच होणार आहे, हेदेखील त्यांनी सांगून टाकले. त्यांच्या या गुगलीने व्यासपीठावरील नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

पोलिस बनले हातचे बाहुले
मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना पोलिसांना बळ दिलं होतं. पण आताच्या सरकारने याच पोलिसांना हातचे बाहुले केले आहे. भ्रष्ट पोलिस अधिकार्‍यांना पाठीशी घालून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पंकजा यांनी केला.
( फोटो : चाळीसगाव येथे संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या सभेत शुक्रवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दोन्ही नेत्यांनी तलवारी उंचावून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले)