आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Assembly Election 2014 Jalgaon Constituency News In Marathi

प्रचार वॉर: आश्वासनांची खैरात अन‌् विकासाची स्वप्ने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्यातील लढतीमुळे आधीच चर्चेत असलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपचे पी. सी. पाटील, कॉंग्रेसचे डी.जी. पाटील देखील रिंगणात असल्याने चौरंगी लढत हौत आहे. चारही प्रमुख पक्षांकडून प्रचारात आश्वासनांच्या खैराती वाटल्या जात आहेत. ‘विकास’ हा चारही उमेदवारांचा समान मुद्दा असून एकमेकांना उघडे पाडत आपण कसे सरस आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्ष गाव आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर उमेदवारांचा भर आहे.

शिवसेना : आठ दिवसांत कर्जमाफी अन् विकास कामे
गुलाबरावपाटील - शिवसेनेचे सरकार आल्यास आठ दिवसांत कर्जमाफी, मतदारसंघातून क्रॉम्प्टनची हकालपट्टी, अपूर्ण कामे मार्गी लावणे, मोठ्या गावांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे, गिरणा नदीवर प्रत्येक १० किलोमीटरवर पाणी अडवणे आदी मुद्दे प्रचारात वापरले जात आहेत. कृषिमंत्री असूनदेखील एकही काम पूर्ण करू शकले नाही. सर्व पूल, स्मारके अपूर्ण असल्याचा मुद्दा प्रचारात वापरला जात आहे.
भाजप: ‘एकवेळ भाजपलादेखील संधी देऊन पहा’
पी.सी. पाटील - केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे. राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी आणि एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपला मत देणे आवश्यक असल्याचा प्रमुख मुद्दा प्रचारात वापरला जात आहे. या मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला देखील संधी दिली आहे. एकवेळ भाजपला देखील संधी देऊन पहा, असे भावनिक आवाहन केले जात आहे. प्रत्येक गावात, मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात आहे.

राष्ट्रवादी: पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेली कामे
गुलाबराव देवकर - पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेली कामे, पालकमंत्री असताना उमटलेली कर्तृत्वाची छाप, जिल्हा नियोजनाचे वाढवून दिलेले बजेट, उड्डाणपूल, स्मारके, वैयक्तिक स्वच्छ प्रतिमा, जनसामान्यांशी असलेला संपर्क हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. मंत्रिपदाच्या कार्यकाळात मतदारसंघात केलेली कामे आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचा दावा देवकर समर्थक वाल्मीक पाटील यांनी केला आहे.
काँग्रेस: स्थानिक उमेदवार असल्याचा प्रमुख मुद्दा
डी.जी. पाटील - राष्ट्रवादीचे उमेदवार तुरुंगात आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराला दोन वेळा संधी देऊनही मतदारसंघात ठोस कामे झाली नाहीत. भाजपच्या उमेदवाराचा चेहरा अकार्यक्षम आहे. मंत्र्यांचा मतदारसंघ असूनही व्हीजन नाही. धरणगाव शहराला अजूनही पिण्याचे शुद्ध पाणी नाही. सिंचनाचा अभाव आहे. मतदारांनी संधी दिल्यास सर्वांगिण विकास, शुद्ध पाण्याची हमी, सिंचन वाढवणार आहेत. धरणगावातील स्थानिक उमेदवार असल्याचा मुद्दा वापरत आहे.