आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtrian Woman News In Marathi, Motorcycle, Automobile, Divya Marathi

मोटारसायकल दुरुस्तीचे काम करताहेत तरुणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनाशी ठाम राहून कठीण काम करण्याचा निश्चय केला तर जगात काहीही अवघड नाही. मग ती महिला असो पुरुष याची प्रचिती आणून दिली ती दोन मोटारसायकल मेकॅनिक तरुणींनी. सातपुडा ऑटोमोबाइल्समध्ये सुगंधा भास्कर चौधरी व श्रद्धा आनंद सनान्से या दोघी मेकॅनिकचे काम करीत आहेत. मेकॅनिकदादांची जागा आता ताईंनी घेतली.
मेकॅनिकचा ड्रेस, बूट परिधान करून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्या काम करतात. जिद्द आणि बुद्धिकौशल्याची जोड देत कोणतेही आव्हान पेलण्यास आम्ही सक्षम आहोत असे त्या तरुणी सांगतात. सुगंधा ही असोदा येथील असून तिचे वडील शेतकरी आहेत तर श्रद्धा ही जळगावची असून तिचे वडील ऑटो मेकॅनिक आहेत. दोघांच्याही घरातून त्यांना सतत पाठिंबा व प्रोत्साहन मिळत असते.
आयटीआय करून प्रशिक्षण
त्यांनी शासकीय आयटीआयच्या एक वर्षाचा डिप्लोमा केला. सध्या गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये दोन वर्षाचे प्रशिक्षण (अँप्रेंटिसशिप) त्या घेत आहेत. सहा मुलींच्या बॅचमधून दोनच मुली येथे प्रॅक्टिकलचे काम करीत आहेत. डिझेल मेकॅनिकल या विषयात त्यांनी शिक्षण घेतले आहे. आयटीआयकडूनच त्यांचे हे प्रशिक्षण केले जाते.
मेकॅनिकची सगळी कामे हाताळतात दोघी
एखाद्या पुरुष मेकॅनिकप्रमाणेच या दोघी काम करताना दिसून येतात. टू व्हिलरच्या इंजीनचे पार्ट ओपन करण्यापासून त्या इंजीनचे ऑईल बदलणे, एखादा पार्ट खराब झाला असल्यास तो बदलणे, गाडीची सर्विसिंग करणे यात ब्रेक फिटिंग करणे, फिल्टर साफ करणे, काबरेरेटर साफ करणे, क्लच केबल तपासणी, हेडलाइट इंडिकेटर चेक करणे, तसेच नट फिटिंग करणे यासारखी कामे या मुली करतात.
श्रद्धा सनान्से, जळगाव : कोणतीही गोष्ट, क्षेत्र महिलांसाठी अवघड नाही. करायला गेले तर सगळे काही सोपे आहे. वडिलांकडे नेहमी पाहताना गाडीच्या प्रत्येक भागाबाबत उत्सुकता वाटायची व तेव्हाच ठरविले आपल्यालाही वडिलांसारखेच काम करायचे आहे.
सुगंधा चौधरी, असोदा : मला या क्षेत्रात आधीपासूनच आवड होती. वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी होकार दिला. असोदा येथून ये-जा करते. यानंतर मला इंजिनिअरींग करायची इच्छा आहे.