आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti News In Marathi, BJP, Lok Sabha Election, Jalgaon, Divya Marathi

महायुती ‘छत्री’छायेत, तर उमेदवाराचा उन्हातही उत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे शुक्रवारी रॅली काढण्यात आली. भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्यासाठी उत्सुक असलेले माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी या रॅलीत सहभागी होणार असल्याचे संकेत होते. मात्र, त्यांच्यासह त्यांचे सर्मथक रॅलीपासून लांब राहिले. ते आणखी किती दिवस अशी भूमिका कायम ठेवतात? याकडे त्यांच्या विरोधकांचेही लक्ष लागून आहे.


भाजपाची प्रचार रॅली शुक्रवारी भरउन्हात दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयापासून सुरू झाली. सजवलेल्या रथावर महायुतीचे स्थानिक पदाधिकारी तर दुसर्‍या उघड्या जीपवर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे होत्या. प्रचार रथावर लावलेल्या छत्रीखाली पदाधिकारी उभे राहून मतदारांना नमस्कार करून आवाहन करीत होते. मात्र, दुसर्‍या उघड्या जीपवर रक्षा खडसे या कडक उन्हाचा तडाखा सहन करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होत्या. परंतु महायुतीचे पदाधिकारी छत्रीच्या छायेत तर उमेदवार उन्हात असल्याची चर्चा कर्णोपकर्णी सुरू झाल्याने अवघ्या 10 मिनिटांतच प्रचार रथावरील छत्री काढून घेण्यात आली, हे विशेष.


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. त्या ठिकाणी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भगव्या रंगाच्या गांधी टोपीवर एका बाजूला ‘नमो: नमो:’ तर दुसर्‍या बाजूला ‘मोदी फॉर पीएम’ असा मजकूर लिहिलेला होता. भुसावळच्या प्रचार रॅलीत मात्र, ‘नमो : नमो:’ ऐवजी ‘नमो: नाथ’ असा बदल करण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवले. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे खंदे सर्मथक अशोक चौधरी हे अष्टभुजा देवी मंदिरासमोरील चौकात उभे होते. महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना ‘हात उंचावून रॅलीत सहभागी होण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनीही हात उंचावून केवळ स्मित हास्य करून जागेवरच थांबणे पसंत केले. अनिल चौधरींनी गेल्या आठवड्यात भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, या वेळी त्यांना नगरसेवक वसंत पाटील यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती. शुक्रवारच्या प्रचार रॅलीत पुन्हा तसा अनुभव येऊ नये, म्हणून चौधरींनी चार हात लांब राहणे पसंत केले असावे, असा तर्क चिकित्सक राजकारण्यांकडून लढवला जात आहे.


मिकी माऊस कशाचं द्योतक समजायचे?
भाजपने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. मात्र, भुसावळच्या रॅलीत प्रचार रथावरील वाहनात छोटाभीम अन् रॅलीच्या अग्रभागी मिकी माऊसचा वापर करण्यात आला. मतदानाचा हक्क 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांना आहे. असे असताना लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी जी साधने वापरली जातात, ती प्रचार रॅलीत वापरली जाणे हे कशाचं द्योतक समजायचे? असा प्रश्न उपस्थित होणार नाही तरच नवल.

लोणारींनी नकळतपणे घेतला कानोसा!
महायुतीची प्रचार रॅली अष्टभुजा चौकातून गंगाराम प्लॉट भागाकडे 2 वाजून 20 मिनिटांनी रवाना झाली. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी हे अष्टभुजा चौकात दुचाकीने आले. अशोक चौधरी, नितीन धांडे यांनी आवाज दिल्यानंतर ते येथे थांबले. हा योगायोग असला तरी भाजपच्या रॅलीत अनिल चौधरी व त्यांचे सर्मथक सहभागी होतात की नाही? या संदर्भातील कानोसा घेण्यासाठीच त्यांची ही दुचाकीवरील भ्रमंती असू शकते.