आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशिराबादच्या महेंद्रची अंटाक्र्टिकावर स्वारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लहानपणी चित्रकलेची आवड असताना पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्याने अभियांत्रिकीची गोडी निर्माण झाली. रंगांच्या माध्यमातून देखावा निर्माण करता करता स्पेअर पार्टच्या माध्यमातून वस्तू तयार करण्यात हातखंड निर्माण झालेल्या नशिराबादच्या महेंद्र सपकाळेंनी व्हाया पुणे मार्गे आता अंटाक्र्टिकावर जळगावचे नाव कोरण्यासाठी कुच केली आहे.

मुळगाव कडगाव असलेल्या व नशिराबाद येथील रहिवासी महेंद्र सपकाळे तसेच पुणे येथील हवामानशास्त्र विभागातील त्यांचे सहकारी विलास शिंदे हे दोघे शुक्रवारी रात्री तीन महिन्यांकरिता ‘स्नो गेज, थर्मामिटर्स आणि हवामान विषयक संशोधनासाठी आवश्यक उपकरणे बसवण्याची अवघड कामगिरी व आव्हान स्वीकारून अंटाक्र्टिकाच्या मोहिमेवर रवाना झाले आहेत.
दोन अडीच महिने राहून तेथील ‘भारती’या नवीन संशोधन केंद्रात उपकरणे बनवण्याची कामगिरी ते पार पाडणार आहेत.

अमरनाथच्या बर्फातही केले काम
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमरनाथ यात्रेला जाणार्‍या भाविकांना तेथे हवामानाची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी 6 स्टेशन उभारले आहेत. एप्रिल व जून महिन्यात त्याठिकाणी कामाची संधी मिळाली होती. त्या अनुभवाचा फायदा अंटाक्र्टिका स्वारीसाठी होत असल्याचे महेंद्र सपकाळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

‘व्हीआयपी’तून हवामान खात्यात
नशिराबाद येथे माध्यमिक शिक्षण घेतलेले महेंद्र सपकाळे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. सन 1991-92 च्या काळात औरंगाबाद रोडवरील व्हीआयपी कंपनीत नोकरी केली. काही काळातच शासकीय नोकरीची संधी मिळाली. भारतातील हवामानाच्या मोजमापासंदर्भात तयार करण्यात आलेल्या यंत्रांची चाचणी घेऊन ती योग्य की अयोग्य ठरवण्याचे काम सपकाळे करीत असतात.