आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडू पाटील खूनप्रकरणी प्रमुख आरोपी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी पारोळा येथील दगडू गजमल पाटील यांचा 18 सप्टेंबरला खून झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सुरत येथून तीन संशयितांना अटक केली. या संशयितांनी दोन लाखांची सुपारी घेऊन पाटील यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.

दगडू पाटील हे पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील ‘यशवंत माध्यमिक शिक्षण मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या ताब्यातून संस्था बळकावण्यासाठी त्यांचा खून झाला, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच त्यांच्या खुनानंतर भूषण पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र रामभाऊ पाटील, दिनकर रामदास पाटील आणि प्रकाश आत्माराम पाटील या संशयितांना अटक करण्यात आली होती. हे तिघे आता न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिता पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते, सहायक निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुरलीधर आमोदकर, तुकाराम निंबाळकर, ईश्वर सोनवणे, योगेश पाटील, विजय पाटील, रवींद्र गिरासे व रवींद्र चौधरी यांच्या पथकाने सुरत येथून सुनील विलास पाटील, किरण प्रकाश पाटील आणि मीनाबाई जगतसिंग गिरासे यांना अटक केली. तिघांना पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यातील सुनील पाटील हा मूळचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळचा, तर किरण पाटील रावेर तालुक्यातील गहुखेडा येथील रहिवासी आहे.

कर्जामुळे खुनाची सुपारी!
किरण आणि सुनील हे दोघेही दगडू पाटील यांचा खून करण्यासाठी जीजे-05/डीएल-1823 या क्रमांकाच्या मोटारसायकलने रत्‍नपिंप्री येथे आले होते. सुनीलवर आठ व किरणवर दोन लाखांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी मोठी रक्कम मिळावी म्हणून दोघांनी पाटील यांचा खून करण्याची सुपारी घेतली. त्यासाठी त्यांना दोन लाख रुपये देण्यात आले होते. तसेच खून करण्याआधी आणि नंतर दोघेही सुरत येथे मीनाबाई पाटीलला जाऊन भेटले होते. मीनाबाईच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

तिघांनी दिली कबुली
पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण, सुनील आणि मीनाबाई यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच रवींद्र रामभाऊ पाटील, दिनकर रामदास पाटील आणि प्रकाश आत्माराम पाटील यांनीच आम्हाला दगडू पाटील यांचा खून करण्यासाठी दोन लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील आणि किरण यांनी विषारी इंजेक्शन देऊन दगडू पाटील यांना मारण्याचा प्रय} केला; मात्र तो असफल झाल्यामुळे सुनीलने दगडू पाटील यांचे गुप्तांग पिळले. तसेच हातरुमालाने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शेतातील पाण्याच्या हौदात बुडवून ठेवला होता.