आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीने बदला जग: फेरीवाल्याने उभा केला प्रेमाचा आदर्श

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर गर्भपिशवीला झालेल्या गंभीर इजेवर उपचारासाठी येणारा पाऊण लाखाचा खर्च पेलण्यासाठी शाहूनगरातील एका चिक्कू विक्रेत्याने घर गहाण ठेवले आणि पत्नीला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणून आपल्या प्रेमाची प्रचिती करून दिली.
शाहूनगरातील मोहंमद जावेद खान हा हातगाडीवर चिक्कू विकतो. तीन महिन्यापूर्वी गर्भवती पत्नी शबिनाबीला त्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने गोंडस उमरला जन्म दिला. एकीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद तर दुसरीकडे पत्नीला वाचविण्याची कसरत, अशा संघर्षातून जावेदला जावे लागले. बाळ सुखात असताना मातेलाही अग्निदिव्यातून जावे लागले. गर्भपिशवीला मोठी इजा झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. संबंधित डॉक्टरांनीही आर्थिक परिस्थिती पाहून उपचारास नकार दिला. हीच स्थिती अन्य रुग्णालयांमधून दिसून आली. शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरांनी लाखोचा खर्च सांगत उपचार देणे टाळले. त्यात आठवडा गेला. उपचारासाठी मोठी हॉस्पिटल्स फिरत असताना शबिनाबीची तब्बेत खालावत चालली होती. घरातील वस्तू व अन्यत्र पैसे जमवत पत्नीच्या प्रेमापोटी जावेदने आपल्या गेंदालाल मिलमधील दोन रूमचे घर भोई नामक व्यक्तीला 50 हजारांत गहाण ठेवले. या रकमेसोबतच शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळविली. थकलेल्या, हताश झालेल्या जावेदने शेवटची आशा म्हणून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पत्नीला दाखल केले. गर्भपेशीतील जखम अतिशय घातक झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास कडुसकर, डॉ. शबरी पुकार, डॉ.महेश पुकार, डॉ. प्रशांत पाटील यांनी शबिनाबीवर तत्काळ शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढून टाकली. तिला वाचविण्याचा दुसरा पर्याय नसल्याने पती व नातलगांच्या संमतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बाळ व बाळंतीण पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, अर्धांगिणीला वाचविण्यासाठी जावेदला निवार्‍याची आहुती द्यावी लागली. एका वर्षात रक्कम परत करण्याच्या बोलीवर घर गहाण ठेवलेल्या जावेदला आता अपेक्षा आहे दानशुरांच्या मदतीची.
जावेदला मदतीसाठी दानशुरांनी गोदावरी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी (9373950012) यांच्याशी संपर्क साधावा.
दहा लाखांतील एक अशी अत्यंत दुर्मिळ घटना
-शमिनाबी ही रुग्ण दाखल झाली तेव्हा तिची अवस्था बिकट होती. तिच्या गर्भपिशवीचा आकार डिलीव्हरीनंतरही मोठाचा होता. त्यात पू साचला होता. त्यामुळे ती काढून टाकण्यात आली. अशी घटना 10 लाखांत फक्त एखाद्याच रुग्णात आढळून येते. डॉ. महेश पुकार