आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहारदार गीतांच्या तालावर आबालवृद्धांनी उडवले पतंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ढीलदे.. ढील दे.. दे.. रे.. भैय्या, इस पतंग को ढील दे..., चली चली रे पतंग मेरी चली रे.., एक कटी पतंग है.. यासह अनेक बहारदार गीतांच्या संगतीने मुलांसह वयोवृद्धांनी गुरुवारी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. निमित्त होते विविध संस्था संघटनांतर्फे आयोजित पतंग महोत्सवाचे. शहरातील सागर पार्क, रायसोनी विद्यालय, मेहरूण तलाव परिसरासह एकलव्य क्रीडा संकुलामध्ये पतंग महोत्सव चांगलाच रंगला. यात लहान मुलांसह महिला, वयोवृद्धांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला. पतंगावर स्वार होत अाकाशात उंच भरारी घेत सूर्याला हाक घालीत त्यांची आराधना करण्याचा अनुभव अनेकांनी अनुभवला.
रायसोनीत तरुणाईचा जल्लोष
रायसोनीग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या शिरसोली रोडलगतच्या परिसरात जल्लोषमय वातावरणात पतंगोत्सव साजरा झाला. या वेळी विविध मराठी, हिंदी गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला. यात जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, व्यवस्थापनशास्त्र या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. रायसोनी ग्रुपचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ. प्रभाकर भट, डॉ. प्रीती अगरवाल उपस्थित होते.

जखमी पक्ष्यांवर उपचार
पतंग उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकाशातील पक्षी जखमी होणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी पक्षिमित्र पर्यावरणप्रेमी विवेक देसाई, मयूर जैन, गणेश सोनार, इम्रान तडवी आदी सज्ज होते. संक्रांतीच्या मुहूर्तावर पतंग उडवण्याचे प्रमाण अधिक असल्याने पक्ष्यांना त्रास होऊन पक्षी जखमी होण्याच्या घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर पक्षिमित्रांनी उपचाराची तयारी ठेवली होती. मात्र, कुठेही पक्ष्यांना इजा पोहोचल्याची घटना नसल्याचे पक्षिमित्र विवेक देसाई यांनी सांगितले.
अनाथ मुलांचा उत्साह
गर्जनाप्रतिष्ठान मू.जे. महाविद्यालयातील इव्हेंट मॅनेजमेंट विभागातर्फे केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनाथ गतिमंद मुलांच्या उत्साहात चैतन्य आणले. विविध शाळांतील १३५ गतिमंद अनाथ मुले यात सहभागी झाले होते. उत्सवावेळी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पिंपळवाडकर, डॉ. ए. पी. सरोदे, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, पंकज कासार, प्रा. सुभाष तळेले, अजय शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद शिंदे, निखिल चौधरी उपस्थित होते. मुकुंदा पाटील, सुयोग नेवे, सुमंत माळी, भूषण कुलकर्णी, राहुल सोनवणे यांनी नियोजन केले.
एल.के. फाउंडेशनचा पतंगोत्सव रविवारी
एल.के.फाउंडेशनतर्फे रविवारी सकाळी १० वाजता सागर पार्क मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन केले अाहे. या वेळी सहभागींना दोरा पतंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वेळी डीजेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. नगरसेवक ललित कोल्हे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद््घाटन होईल, असे नगरसेवक अनंत जोशी, संदीप सूर्यवंशी यांनी कळवले आहे.