आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Women Rush In Market In Bhusawal

हलव्यापासून तयार केलेले दागिने खरेदीवर महिलांनी दिला भर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकर संक्रांतीचा सण रविवारी उत्साहात झाला. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तिळीचे लाडू, काटेरी हलवा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने चैतन्य पसरले होते. रविवारी येथे आठवडे बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही येथे मोठ्या संख्येने येतात.
रविवारी संक्रांत असल्याने आणि त्यातच नोकरदारांना सुटी असल्याने बाजारात गर्दी झाली होती. गतवर्षापेक्षा यंदा हलव्याचे दर किलो मागे पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. किलोभर हलवा घेणारे जरी मोजकेच असले तरी 50, 100 ग्रॅम वजनाच्या पुड्या घेणा-यांवरच मुलांचा जास्त भर राहत असतो. त्यामुळे दुकानदार आणि हातगाडीवर हलवा विक्रीसाठी लहान आकाराच्याच पुड्या बनवित असतात. या पुड्या हातोहात विक्री होत असतात. पाच रुपये, दहा रुपये, पंधरा रुपये किमतीच्या या पुड्या असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूसह लहान मुलांना हलव्याचे दागिणे घालण्याची जुनी प्रथा आहे. त्याचसोबत जावायाला तीळगुळ व साखरेचे नारळ दिले जात असते. याच पार्श्वभूमीवर बाजारात हलव्याचे दागिने 200 रुपयांपासून ते 900 रुपयांपर्यंत विक्रीस आहे. हलव्याचे दागिने तयार करण्यात शहरातील काही महिला घरगुती दागिने तयार करून विकत असतात. आठ ते दहा दिवस अगोदरच ऑर्डर घेऊन महिला कामाला लागतात आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी ऑर्डरीचा माल संबंधितांना देत असतात. हलव्याचे दागिने 200 ते 900 रुपये सेट तर हलवा 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री झाली. बाजारात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खरेदीसाठी गर्दी होती.
संक्रांतीच्या पुण्यकर्माचा घेतला लाभ - यंदा 14 जानेवारीला रात्री 12 वाजून 58 मिनिटांनी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला. त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ रविवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होता. यंदाचे संक्रमण वणिज करणावर होत असल्याने वाहन रेडा असून उपवाहन उंट आहे. संक्रांतीने निळे वस्त्र परिधान केले असून हातात आयुध म्हणून तोमर धारण केले आहे. तीने अळिताचा तिलक लावला असून वयाने वृद्ध व बसलेल्या अवस्थेत आहे. सुवासासाठी हातात रुईचे फूल घेतले आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. भूषणार्थ नील रत्नधारण केले आहे. ती दडी भक्ष्ण करत असून ती हरीण जातीची आहे. तिचे वारनाव राक्षसी असून नक्षत्र नाव नंदा आहे. पुण्यकर्माचा लाभ घेतला आहे. - तुषार नाईक, पुरोहित, भुसावळ
वाण खरेदीसाठी गर्दी - मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी -कुंकवाचा कार्यक्रम करीत असतात. त्यामुळे महिला हळदी-कु कंवाचे वाण लुटण्यासाठी बाजारात वाण खरेदी करण्यसाठी गर्दी करत आहेत. हळदी-कुंकवाची भेट (वाण) देण्यासाठी महिला चमचे, लेडीज हात रुमाल, गृहपयोगी वस्तू विकत घेण्यावर महिलांचा जास्त भर आहे. प्लॉस्टिक कंटेनर त्यात तीनचा एकत्र सेट किंवा एक वेगळा, चीज ड्रायफुट स्लायझर, बॉस्केट, ज्वेलरी बॉक्स, मोबाइल कव्हर, बादल्या अशा वस्तूंना महिलांनी पसंती दिली. संक्रांतीला वाण देण्यासोबतच बोरन्हाण देखील असते. ज्यांची पहिलीच संक्रांत असेल ते मुलगा-मुलगी यांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवितात. गल्ली, कॉलनीतल्या लहान मुलांना एकत्र जमवून खावू वाटप करतात.
इच्छेनुसार दान करणे महत्त्वाचे - संक्रांतीच्या पुण्यकाळात दान करण्यास जास्त महत्त्व दिले आहे. दान करणा-यांनी नवे भांडे, तिळीने भारलेले भांडे, गाय, गायीस चारा, सुवर्ण, भूमी आदी दानकरणा-यांनी त्यांच्या इच्छेनुसार आणि ऐपतीनुसार दान करावयाचे असते त्याचे जास्त पुण्य मिळत असते. माणूस इतर वेळी तर दानधर्म करतोच; पण संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर केलेले दान हे शास्त्रानुसार अधिक योग्य मानले जाते. धार्मिक परंपरा, सणांचे महत्त्व या निमित्ताने कसे जोपासले जाईल याचाही विचार होणे गरजेचे आहे. - अतुल कुळकर्णी, ज्योतिषी, भुसावळ