आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Make Ready Of Vidhan Sabha Election In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्तनीतील निखांरे शोधून काढा - शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकरांचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सामर्थ्याचा उपयोग एकमेकांचे पाय ओढण्यासाठी नव्हे, तर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करा. तसेच अस्तनीतील निखारे शोधून काढा. ‘माझा महाराष्ट्र , भगवा महाराष्ट्र ’ हे मिशन डोळ्यासमोर ठेवून संघटनबांधणी मजबूत करा. सेनेत एकमेकांवर अंकुश ठेवणारी पदे आहेत, याचे भान असू द्या, असा परखड सल्ला शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.
भुसावळ येथे ब्राह्मण संघाच्या सभागृहात रविवारी शिवसेनेचा बूथप्रमुख व पदाधिका-यांचा मेळावा झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत विजय मिळवायचा असल्यास ती गांभीर्याने घ्यावी लागते. धगधगता अंगार गेला कुठे? तेज लोप का पावले? याचा विचार शिवसैनिकांनी केला पाहिजे. निखा-यांवर साचलेल्या राखेवर फुंकर मारण्यासाठी मी आलो आहे. आंदोलन हा शिवसेनेचा स्थायिभाव आहे. विजयाचा उन्माद असावा; पण तो किती काळ? याचे भान ठेवले पाहिजे. पराभव अन् विजय दोघांची कारणमीमांसा होणेही गरजेचे आहे.

मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका. लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांना जे लाखांचे मताधिक्य मिळाले ते आता मिळेल, असेही नाही. गाफील राहिल्यास विरोधक आपला डाव साधतील. जनतेचा आधारवड म्हणून काम केल्यास मतदार जवळ करतील. मात्र, त्यासाठी कृतीप्रवण कार्यक्रमांवर भर द्या व घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका समजावून सांगा, असेही ते म्हणाले.
मतदारसंघावर भगवा फडकवू
मनोज बियाणी : भुसावळ मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहोत. नियोजन व संघटनात्मक बांधणी करून या मतदारसंघावर भगवा फडकवू.
इंदिराताई पाटील : संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाने रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा, भुसावळ या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवू. मात्र, त्यासाठी जबाबदारीने काम करावे लागेल.
चंद्रकांत पाटील : दळभद्री कॉँग्रेस आघाडी सरकारने भारनियमनाचा कहर केला आहे. मोजून चार तासही वीजपुरवठा सुरळीत राहील की नाही? अशी परिस्थिती आहे. म्हणूनच या सरकारला पायउतार केले पाहिजे.
यांची प्रमुख उपस्थिती
माजी आमदार दिलीप भोळे, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख मनोज बियाणी, उपजिल्हाप्रमुख सुखदेवराव निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, तालुकाप्रमुख रमाकांत महाजन, शहरप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, अ‍ॅड.राजेश झाल्टे, प्रा.उत्तमराव सुरवाडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक इंदिराताई पाटील यांच्यासह पदाधिका-यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
..तर राष्ट्र वादी वांढलीच नसती
शिवसेनेचे पदाधिकारी अन् जबाबदार कार्यकर्त्यांनी गतकाळात झालेले पराभव गांभीर्याने घेऊन आत्मपरीक्षण केले असते, तर जिल्ह्यात राष्ट्र वादी वाढलीच नसती. कधीकाळी ‘कॉँग्रेसचा बालेकिल्ला’ अशी ओळख असलेला जळगाव जिल्हा मध्यंतरी ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जायचा. शिवसैनिकांनी सांडलेल्या रक्तामुळे हे शक्य झाले होते. आता पुन्हा ते दिवस येण्यासाठी जिद्दीने कामाला लागले पाहिंजे. एकदिलाने सर्वांनी काम केल्यास जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांनी व्यक्त केला. त्यांनी या वेळी अनेक आठवणींना उजाळा दिला.