आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान: ‘मलई’साठी दुधात भेसळ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दूधवाल्यामार्फत किंवा पिशवीद्वारे घरी येणारे दूध किती शुद्ध आहे? याचा अंदाज कोणत्याही ग्राहकाला लावता येणार नाही. मात्र, एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार देशात 68.44 टक्के दूध भेसळयुक्त आहे. त्यापैकी ग्रामीण भागातील प्रमाण 31 टक्के आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत 22 पैकी 3 नमुने अप्रमाणित आढळले होते.

मंगळवारी राजधानी मुंबईमध्ये दिवसाढवळ्या दुधाची होणारी भेसळ उघडकीस आली होती. यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी चालणारा खेळ किती घातक आहे? याची झलक सर्वांना दिसली. भुसावळ शहर विभागातही दुधामध्ये भेसळ करणारे टोळके कार्यरत असल्याची चर्चा आहे. संकलन केंद्रामध्ये एकत्रित होणार्‍या दुधामध्ये पाणी मिसळून प्रचंड नफेखोरी होते. या पुढे जाऊन शरीराला प्रचंड हानिकारक ठरणारे डिटर्जंट पावडर, युरियासारख्या पदार्थांचा वापर करून भेसळ केली जाते. अधिकाधिक दुग्धोत्पादनासाठी दुभत्या जनावरांना ऑक्सोटिसीन देण्याकडे अनेक पशुपालकांचा कल असतो. त्यामुळे मिळणारे दूध शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.

दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी केली जाते. तपासणीत अप्रमाणित आढळणार्‍या नमुनाधारकांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाते. सन 2012-13मध्ये विभागाने जिल्ह्यातील 22 दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली होती. त्यापैकी 19 नमुने प्रमाणित तर तीन नमुने अप्रमाणित आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.


दुधात यांची होते भेसळ

धान्य पावडर

फॅटची मात्रा वाढवण्यासाठी तसेच भेसळ लपवण्यासाठी साबुदाणा,तांदूळ, गहू आणि मक्याच्या पिठाचा वापर केला जातो. धान्य पावडर मिसळल्याने दुधाचा न्यूट्रिशिअन दौरा रद्द होतो.

युरिया
सिंथेटिक दुधामध्ये फॅट वाढवण्यासाठी भेसळखोर युरियाचा वापर करतात. युरिया मिसळलेल्या दुधाचा पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

डिटर्जंट पावडर
दुधामध्ये डिटर्जंट किंवा वॉशिंग मशीन पावडरचा वापर फॅट किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी केला जातो. पचनसंस्थेवर याचा वाईट परिणाम होतो.

साखर
अधिक पाण्याचा वापर केल्यानंतर लॅक्टोमीटरवर कमी नोंद होऊ नये म्हणून दुधामध्ये साखरेची भेसळ केली जाते. साखरेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत नसले तरी दूषित पाणी असल्यास आरोग्य बिघडू शकते.

भेसळयुक्त दुधाचे असे आहे प्रमाण
फूट सेफ्टी स्टँडर्ड अँथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात विक्री होणार्‍या दुधामध्ये सुमारे 68.44 टक्के दूध भेसळयुक्त आहे. ग्रामीण भागातील हे प्रमाण 31 टक्के आहे. शहरी भागातील 69 टक्के नमुने अप्रमाणित असल्याचे सव्र्हे सांगतो. भुसावळसारख्या संवेदनशील शहरातही दूध भेसळीसारखे काही प्रकार सरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन दक्षता घेणे गरजेचे आहे.

आम्ही लक्ष ठेवून
गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाने दूध संकलन केंद्रे, विक्री होणारे बुथ, जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील डेअरी, फिरत्या विक्रेत्यांकडील दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली. 22 पैकी तीन नमुने अप्रमाणित आढळले होते. बी.यू.पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव