जळगाव: गेल्यातीन महिन्यांपासून गाजत असलेल्या ममुराबाद राेडवरील नाल्याचा मार्ग वळवणे बंदिस्त केल्याप्रकरणी प्रकरण कारवाईच्या टप्प्यात अालेले असताना ले-अाऊट मंजुरीची महत्त्वाची फाइलच पालिकेतून गहाळ झाली अाहे. त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेकडे पुन्हा एकदा संशयाने पाहिले जात अाहे. एवढ्या माेठ्या बेजबाबदार कृतीला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध थेट पाेलिसात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत.
ममुराबाद राेडलगत श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात अाले अाहे. बांधकाम करताना नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला तसेच नाला बंदिस्त केल्याप्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी अायुक्तांकडे तक्रार केली अाहे.
या तक्रारीनंतर अायुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन नाल्याची पाहणी केली हाेती. त्यात नाल्याच्या प्रवाहाबाबत वेगवेगळ्या पातळीवर पडताळणी करण्यात अाली असून नाला बंदिस्त केल्याने अायुक्त जीवन साेनवणे यांनी विकासकाला १५ दिवसांपूर्वी नाेटीस बजावली अाहे. त्यात नाल्यावरील स्लॅब काढून टाकण्याचे अादेश दिले असून नाला अरुंद केल्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना केल्या हाेत्या.
जबाबदार अधिकाऱ्याच्या नावाची विचारणा
विकासक श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांनी बाजू मांडण्यासाठी काही कागदपत्रांची पालिकेकडे मागणी केली अाहे. मात्र, विकासकाला अपेक्षित असलेली कागदपत्रे देण्यासाठी पालिकेकडे संबंधित फाइल उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती समाेर अाली अाहे. संबंधित बांधकाम सुरू असलेल्या ले- अाऊट मंजुरीची फाइलच महापालिकेतून गहाळ झाल्याने अापल्याच यंत्रणेकडे संशयाने पाहिले जात अाहे. अाता महापालिका प्रशासन नगररचना विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरुद्ध पाेलिसांत गुन्हा दाखल करणार अाहे.
यासंदर्भातील फाइल उपायुक्तांकडे प्राप्त झाली असून उपायुक्तांनी नगररचना विभागाला फाइल हाताळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याच्या नावाची विचारणा केली अाहे. नगररचना विभागाकडून यासंदर्भात माहिती प्राप्त हाेताच तक्रार दाखल केली जाणार असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी सांगितले.
नियम बाह्य स्लॅब काढणार
नाल्यावरील टाकलेला स्लॅब हा नियमाविरुद्ध असल्याने ताे तातडीने काढण्याचे अादेश दिले जाणार अाहेत. परंतु नाल्याची रुंदी ठरवण्यासाठी कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याचे अायुक्त जीवन साेनवणे यांनी सांगितले.