जळगाव - जळगावसह भुसावळ, नाशिक, नगर येथील नामांकित सात डॉक्टरांना मामा बनवणा-या सातारा जिल्ह्यातील सचिन रामचंद्र वैराट याला बुधवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अापण टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनीस्ट्रेटर)असल्याची बतावणी करुन आरोपीने मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन डॉक्टरांना कॅशलेस विमा सुविधा कार्यान्वित करून देण्याचे आमिष देत, डॉक्टरांकडून पैसे उकळले असल्याचा आरोप आहे. जळगावातील डॉ. नितीन पाटील (श्रीपाद हॉस्पिटल), डॉ. अनिल खडके (खडके हॉस्पिटल), डॉ. जितेंद्र कोळी (मोर्य हॉस्पिटल), डॉ. पंकज गुजर (गुजर हॉस्पिटल), डॉ. अभय चाैधरी (संजीवनी हॉस्पिटल), डॉ. नरेंद्र भोळे (सरला हॉस्पिटल) आणि डॉ. राहुल महाजन (चिन्मय हॉस्पिटल) या सात डॉक्टरांची लाख ९० हजार १०० रुपयांत फसवणूक केली आहे. वैराट याला २८ जानेवारी रोजी एमअायडीसी पोलिसांनी भुसावळात अटक केली होती. डॉ. नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.