जळगाव - रेल्वेस्थानकावरील पाणपोईवर पाणी पीत असताना गाडी सुरू झाल्याने ती पकडण्यासाठी तरुण पळत सुटला. गाडीचा वेग जास्त असतानाही त्याने डब्याच्या दरवाजाचा दांडा पकडला. पण हात ओले असल्यामुळे तो थेट गाडीच्या खाली निसटला अन् रुळाजवळील प्लॅटफॉर्मच्या कपारीत अडकला. सुदैवाने त्याचे नशीब बलवत्तर असल्याने तो थोडक्यात वाचल्याची घटना रविवारी दुपारी ४.४५ वाजता घडली. तरुणाच्या डोक्याला पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देविदास मल्हारी सोनजे (वय ४०) यांचे सायगाव (ता.चाळीसगाव) येथे कृषी केंद्र आहे. दुकानाच्या कामासाठी ते
आपला मित्र प्रवीण तात्या निकम यांच्यासोबत रविवारी सकाळी १० वाजता जळगावात आले होते. दुपारी वाजता काम आटोपल्यानंतर ते ४.३० वाजेच्या सुमारास रेल्वेस्थाकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २वर आले. ते आग्रा-लोकमान्य टिळक टर्मिनसने (लष्कर एक्स्प्रेस) चाळीसगावला जाणार होते. पण गाडी उशिरा धावत असल्याने सोनजे स्थानकावरील पाणपोईवर पाणी पिण्यासाठी गेले. तितक्यात गाडी रेल्वेस्थाकावर दाखल झाली.
सोनजे पाणी पीत असतानाच गाडीला सिग्नल मिळाला अन् गाडी सुरू झाली. हे पाहून भांबावलेल्या सोनजे यांनी सुमारे २०० फूट अंतर धावत पार करून मित्र निकम बसलेल्या रेल्वेच्या बोगी क्रमांक ७मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उजव्या हाताने दरवाजाचा दांडा पकडला. मात्र, हात ओले असल्याने हात निसटल्याने ते थेट प्लॅटफॉर्म गाडीच्या पायर्यांमधील फटीतून खाली पडले आणि रुळाजवळील प्लॅटफॉर्मच्या कपारीत अडकले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण डोके पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना रेल्वेस्थानकावर अनेक प्रवाशांनी पाहिली पण गाडीचा वेग जास्त असल्यामुळे तिला कुणीही थांबवले नाही. गाडी निघून गेल्यानंतर फलाटावरून निघून गेल्यानंतर प्रवाशांनीच सोनजे यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यांना सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
रेल्वे बलाच्या पोलिसांचे दुर्लक्ष
गेल्याआठवड्यात धावत्या रेल्वेत चढत असताना भुसावळच्या ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर "दिव्य मराठी’ने प्रवासी कशापद्धतीने जीव धोक्यात टाकून प्रवास करता याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही रेल्वे बलाच्या पोलिसांनी काही उपाय केल्यामुळे नागरिक जीव धोक्यात टाकून प्रवास करीत असल्याचा प्रत्यय रविवारी आला.
प्रवाशांच्या मदतीने मित्राला काढले बाहेर
सोनजेगाडी खाली पडल्याचे पाहून दरवाजात उभ्या मित्र निकमने सेकंदाचाही विलंब करता त्याला वाचवण्यासाठी धावत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. आरडा-ओरड केली; मात्र गाडी थांबली नाही. गाडी निघून गेल्यानंतर त्याने प्रवाशांच्या मदतीने मित्राला बाहेर काढले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल शासकीय रेल्वे पोलिसांच्या मदतीने जखमी मित्राला सिव्हिलमध्ये दाखल केले. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या तसेच स्टेशनवर चहा विक्री करणार्या शाहरुख नावाच्या मुलाने ही घटना ‘दिव्य मराठी’कडे कथन केली.